‘भारत टॅक्सी’ (Bharat Taxi) या सहकार तत्त्वावर आधारित देशातील पहिल्या कॅब व वाहन सेवा उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते व केंद्रीय सहकार राज्यमंत्री तथा नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
ही सेवा मोबाईल ॲपद्वारे दुचाकी, ऑटो – रिक्षा आणि चारचाकी मोटारकार उपलब्ध करून देते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आयोजित विशेष सोहळ्यात, ‘भारत टॅक्सी’ उपक्रमांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर आणि सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नल हिमांशू सिंह यांनी सामंजस्य कराराच्या प्रतींचे आदानप्रदान केले.
या सामंजस्य करारानुसार, मुंबईतील प्रवाशांना रेल्वे, मेट्रो आणि बस स्थानकांवरून विनासायास प्रवास करता यावा (Last-mile connectivity) यासाठी महानगरपालिकेच्या अखत्यारीतील जागा व वाहतूक नियोजनात समन्वय साधला जाणार आहे.
राज्याचे सहकार मंत्री श्री. बाबासाहेब पाटील, आमदार श्री. महेश बालदी, आमदार श्री. प्रशांत ठाकूर, आमदार श्रीमती मंदा म्हात्रे, सहकार सचिव श्री. प्रवीण दराडे, केंद्रीय सहकार मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री. रमण कुमार, सहकार आयुक्त श्री. दीपक तावरे, सहकार टॅक्सीचे अध्यक्ष डॉ. जयेन मेहता, ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री.सौरभ राव आदी मान्यवर उपस्थित होते.
***



















