Home आरोग्य / पर्यावरण *रुग्ण संवाद, उपचार आणि चिकित्सेसाठी Vaidya AI या कृत्रिम बुद्धिमत्तेचा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या...

*रुग्ण संवाद, उपचार आणि चिकित्सेसाठी Vaidya AI या कृत्रिम बुद्धिमत्तेचा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य संस्थांमध्ये उपयोग होणार*

34
0

*रुग्ण संवाद, उपचार आणि चिकित्सेसाठी Vaidya AI या कृत्रिम बुद्धिमत्तेचा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य संस्थांमध्ये उपयोग होणार*

*आरोग्य यंत्रणेचे दैनंदिन काम सुलभ होणार*

• *कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्लॅटफॉर्म प्रायोगिक तत्वावर वापरासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि फ्रॅक्टल एनॅलिटिक्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार*

• *रूग्णालय तसेच दवाखान्याच्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर प्रणालीचा वापर होणार*

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानस्नेही पुढाकार घेत एक महत्वाचा सामंजस्य करार बृहन्मुंबई महानगरपालिका आणि फ्रॅक्टल एनॅलिटिक्स लिमिटेड या संस्थेदरम्यान आज (दिनांक ३ जुलै २०२६) बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे दैनंदिन कामकाज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुलभ व्हावे, यादृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर आधारित वैद्य एआय (Vaidya AI) हे आरोग्य क्षेत्रासाठीचे समर्पित असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित या पुढाकाराच्या माध्यमातून नागरिकांसोबतचा संवाद वाढवणे, प्राथमिक टप्प्यातील उपचारासाठीची मदत उपलब्ध करून देणे, बहुभाषिक नागरिकांसोबतचा संवाद करणे आणि रूग्णालय प्रशासनाला कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करणे अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आहेत. प्रायोगिक तत्वावर या प्लॅटफॉर्मचा वापर महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेसाठी करण्यात येणार आहे.

या करारप्रसंगी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारे, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे, संचालय (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रूग्णालये) श्री. शैलेश मोहिते तसेच फ्रॅक्टल एनॅलिटिक्स लिमिटेडचे अधिकारी श्री. श्रीकांथ वेलमकन्नी, श्री. सूरज अमोणकर, श्री. शुभेंदू कानडे आदी मान्यवर उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे याप्रसंगी म्हणाल्या की, मुंबई महानगरात आरोग्य सेवा क्षेत्रासाठी विविध आव्हानांना सामोरे जाताना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पुढाकार हा प्रशासनाला कामकाजासाठी मदतीचा ठरणार आहे. महानगरपालिकेच्या यंत्रणेतील मोठ्या प्रमाणातील वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांच्या कामकाजासाठी ही यंत्रणा मदतीचा पर्याय ठरणार आहे. आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळाला अशा तंत्रज्ञानस्नेही पावलांमुळे अधिक लक्ष केंद्रित करून काम करणे शक्य होईल. महानगरपालिकेच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पाऊल हे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने उचलण्यात आलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. दैनंदिन कामकाजात आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळ, डॉक्टरांचे काम अधिक सुलभ करण्यासाठी ही प्रणाली अधिक परिणामकारतरित्या योगदान देईल, असा विश्वास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी व्यक्त केला.

एआयवर आधारित रुग्णासोबतचा संवाद आणि वैद्यकीय सल्ल्यापूर्वीची माहिती ही डॉक्टरांना बाह्यरूग्ण विभागाच्या ठिकाणी अधिक योग्य सल्ला आणि उपचार देण्यासाठी मदतीची ठरणार आहे. रूग्णांशी संबंधित रक्तचाचणी अहवालातील माहिती ही नागरिकांना सोप्या भाषेत उपलब्ध करून देण्यासाठी वैद्य एआय हा प्लॅटफॉर्म सोयीचा ठरणार आहे. सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या रूग्णालयात अंमलात आणण्यात आलेली हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम (HMIS) ही प्रणाली वैद्य एआय प्रणालीशी संलग्न करण्यात येईल. तसेच महत्त्वाच्या आरोग्य सुविधा आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित सूचना नागरिकांना विविध भाषेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महानगरपालिकेची व्हॉट्स एप चॅटबॉट प्रणाली तसेच रूग्णालयाचे आणि प्रशासकीय कामकाजाचे पोर्टलदेखील वैद्य एआय चॅटबॉटसोबत संलग्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाजावर येणारा ताण कमी करणे, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱयांना दैनंदिन कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार उपलब्ध करून देणे हा प्रणालीचा मुख्य उद्देश आहे. डॅशबोर्डच्या माध्यमातून प्रशासकीय कामकाज सुलभ करण्यासाठी ही प्रणाली मदतीची ठरणार आहे. वैद्य एआय हे प्लॅटफॉर्म हे इंडिया एआय मिशनचा भाग असून एआय फाऊंडेशनल मॉडेल विकसित करण्यामध्ये या संस्थेने योगदान दिले आहे. विविध राज्य आणि शासकीय संस्थांमध्ये आरोग्य आणि प्रशासकीय पातळीवर तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये या संस्थेने योगदान दिले आहे.

महानगरपालिकेच्या आरोग्य संस्थांपैकी राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रूग्णालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण रूग्णालय (कांदिवली), राजावाडी रूग्णालय आणि महानगरपालिकेच्या दवाख्यानात प्रायोगिक कालावधीसाठी या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून कर्मचाऱयांचे प्रणालीवापराबाबतचे प्रशिक्षण, नागरिकांचा प्रतिसाद आणि प्रणालीच्या सुरक्षेबाबतचा आढावा महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला घेणे शक्य होईल.
***
(जसंवि/२५०)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here