प्रत्येक जिल्ह्यात मराठी बांधकाम व्यवसायिक असोसिएशन स्थापन करून विकासकांच्या प्रश्नांसाठी प्रभावी राज्यस्तरीय व्यासपीठ उभारणार
पुणे | दि. २८ जून २०२६
पुणे येथे महाराष्ट्रातील विकासकांची शिखर संघटना असलेल्या मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघाच्या राज्यस्तरीय संयुक्त बैठकीत सर्व संलग्न असोसिएशनच्या प्रतिनिधींच्या एकमताने *प्रकाश भिमराव बाविस्कर* यांची महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच प्रमोद पाटील यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
बैठकीत महासंघाच्या भविष्यातील संघटनात्मक विस्तार, राज्यव्यापी कार्ययोजना आणि बांधकाम उद्योगाच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महासंघाच्या कार्याला शासन, उद्योग व विविध क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभावे या उद्देशाने आमदार प्रवीण दरेकर यांना महासंघाच्या संरक्षकपदाची, गजानन कीर्तिकर यांना प्रमुख मार्गदर्शकपदाची तसेच सतीश मगर यांना प्रमुख सल्लागारपदाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बांधकाम, उद्योग, कायदा, प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांचे मार्गदर्शन व सहकार्य घेऊन महासंघाची राज्यव्यापी संघटनात्मक उभारणी अधिक प्रभावीपणे करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, कार्याध्यक्ष संजय कुलकर्णी, उपाध्यक्ष अजित मराठे, उपाध्यक्ष गजेंद्र पवार, सहसचिव संदीप कोल्हटकर, खजिनदार बाबासाहेब भोसले, तसेच मराठी बांधकाम व्यवसायिक असोसिएशन, पुणेचे अध्यक्ष नितीन देशपांडे, मकरंद केळकर, मराठी बांधकाम व्यवसायिक असोसिएशन, नाशिकचे अध्यक्ष संजय मोरे, अनिल धनवट, सुभाष तमखाने, सचिन चुमडे आणि समाधान सोनवणे यांच्यासह मुंबई, पुणे, नाशिक व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी, विकासक आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश बाविस्कर यांचे उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
नियुक्तीनंतर बोलताना प्रकाश बाविस्कर यांनी सांगितले की, मराठी बांधकाम व्यवसायिक महासंघाला महाराष्ट्रातील सर्वात सक्षम आणि प्रभावी राज्यस्तरीय शिखर संघटना म्हणून विकसित करण्यासाठी व्यापक संघटन विस्तार अभियान राबविण्यात येईल.
यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात “मराठी बांधकाम व्यवसायिक असोसिएशन” स्थापन करण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक तालुका, शहर आणि नियोजन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात शाखा उभारून विकासक, अभियंते, वास्तुविशारद, सल्लागार, कंत्राटदार, पुरवठादार आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांना एका सक्षम व्यासपीठावर एकत्र आणले जाईल.
यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, महासंघ राज्यातील बांधकाम उद्योगासमोरील विविध प्रश्न प्रभावीपणे शासनापुढे मांडेल. विकास परवानग्या, पुनर्विकास, नियोजन प्राधिकरणांतील अडचणी, पायाभूत सुविधा, करप्रणाली, शासन धोरणांतील विसंगती तसेच विकासकांच्या न्याय्य मागण्या शासनापर्यंत कायदेशीर व प्रभावी पद्धतीने पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.
ते पुढे म्हणाले की, महासंघ केवळ समस्या मांडणारी संस्था न राहता शासनाला विकासाभिमुख, कायदेशीर आणि व्यवहार्य धोरणात्मक सूचना देणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य शिखर संघटना म्हणून कार्य करेल. उद्योग, शासन आणि समाज यांच्यात सकारात्मक समन्वय निर्माण करून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात बांधकाम क्षेत्राचे योगदान अधिक सक्षम करण्यासाठी महासंघ कटिबद्ध राहील.
बैठकीच्या शेवटी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात महासंघाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करून बांधकाम व्यवसायिकांना एक सक्षम राज्यव्यापी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
सल्लगार/पीआरओ
दा.सा चा.
+91 85912 80640




















