Home मुंबई महाराष्ट्र ड्रग्ज सापडले तर पोलीस निरीक्षक जबाबदार; फडणवीसांचा विधानसभेत कडक इशारा

महाराष्ट्र ड्रग्ज सापडले तर पोलीस निरीक्षक जबाबदार; फडणवीसांचा विधानसभेत कडक इशारा

40
0

महाराष्ट्र ताज्या बातम्या
ड्रग्ज सापडले तर पोलीस निरीक्षक जबाबदार; फडणवीसांचा विधानसभेत कडक इशारा
२३/६/२६

मुंबई : राज्यात ड्रग्जविरोधी कारवाई अधिक कठोर करण्यात येणार असून ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांचा साठा किंवा विक्री आढळेल, तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला.

शिवसेना (उ बा ठा) पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांच्यासह ४० सदस्यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, अंमली पदार्थांच्या वाढत्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी पथक स्थापन करण्यात येणार आहे. ड्रग्जविरोधी मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतनवाढ आणि पसंतीची नियुक्ती देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या वर्षातील पहिल्या चार महिन्यांत राज्यात २५४ कोटी ५३ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले की, देशातील मोठ्या ड्रग्ज नेटवर्कचा सूत्रधार सलीम डोला याला रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे परदेशातून भारतात आणण्यात आले. त्याच्यासह १२ साथीदारांना मुंबई पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा येथे एमडी ड्रग्ज निर्मितीचे कारखाने उभारल्याची कबुली दिली आहे. जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत राज्यात ड्रग्जसंबंधित १,१४२ गुन्हे दाखल, १,६२६ आरोपींना अटक, तर ३,१९९ ड्रग्ज सेवन प्रकरणे नोंदवण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

फडणवीस यांनी स्पष्ट केले की, केवळ ड्रग्जचा साठा जप्त करण्यापुरती कारवाई न करता त्यामागील संपूर्ण साखळी शोधून मोडून काढण्यावर भर दिला जात आहे. ड्रग्ज तस्करांशी आर्थिक संबंध आढळलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. राज्य सरकारने गृह, महसूल, उद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण अशा १५ विभागांचा समावेश असलेला संयुक्त टास्क फोर्स स्थापन केला असून मुंबईतील जवळपास ३ हजार शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जात आहे. ड्रग्जबाबत माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवून त्यांना पारितोषिक देण्याची योजनाही राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here