Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात न्यायासाठी शिंदेंचा पुढाकार*

*पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात न्यायासाठी शिंदेंचा पुढाकार*

44
0

*अमित शाहांच्या निर्देशानंतर सीबीआय उच्च न्यायालयात करणार अपील*

कोल्हापूर, ता. 20 : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी थेट चर्चा करून या प्रकरणात उच्च न्यायालयात अपील करण्याची मागणी शिंदे यांनी लावून धरली. त्यानंतर अमित शाह यांनी सीबीआयला तात्काळ उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याचे निर्देश दिल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हत्येचे प्रकरण राज्यातील सर्वाधिक गाजलेल्या हत्याकांडांपैकी एक मानले जाते. गेली दोन दशके हा खटला सीबीआय न्यायालयात सुरू होता. या कालावधीत पीडित कुटुंबीयांसह जनतेलाही आरोपींना शिक्षा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्याने कुटुंबीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “हे अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरण आहे. पीडित कुटुंबीयांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही हा विषय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मांडला. या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे.”
शिंदे यांनी स्पष्ट केले की, न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यात येणार असून, कायदेशीर लढाई पुढे सुरू राहील. “सत्य बाहेर यावे आणि पीडित कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल,” असेही त्यांनी नमूद केले.

या प्रकरणात शिंदे यांनी घेतलेल्या सक्रिय भूमिकेमुळे पीडित कुटुंबीयांना दिलासा मिळणार असून न्यायाच्या लढ्याला नवे बळ मिळेल अशी भावना व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here