Home मुंबई *मुंबई परिसरात ‘शून्य जीवितहानी’ उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे: उपमुख्यमंत्री एकनाथ...

*मुंबई परिसरात ‘शून्य जीवितहानी’ उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश*

9
0

*• मुंबईतील १७०० कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण; खड्डे दुरुस्तीसाठीचा ८० टक्के खर्च झाला कमी*

*• मुंबईतील पावसाळापूर्व तयारीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा*

पावसाळ्यात मुंबई आणि महानगर परिसरात शून्य जिवितहानी हे उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे. यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने आपत्ती नियंत्रणासोबतच पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. नाला स्वच्छतेसोबतच भूमिगत टाक्या (होल्डींग पाँड), दरडप्रवण क्षेत्रात संरक्षण जाळी बसवणे, जाहिरात फलकांचे (होर्डींग्ज) संरचनात्मक परिक्षण (स्ट्रक्चरल ऑडीट) करावे. एनडीआरएफच्या धर्तीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपत्ती प्रतिसाद दल तयार करावेत, असे निर्देश असे, निर्देश उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच, प्रशासकीय यंत्रणांनी टीम म्हणून काम करून पावसाळ्यात मुंबईकरांना दिलासा देण्याचे काम करावे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईतील २००० किलोमीटरपैकी १७०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून रस्ते आणि खड्डे दुरूस्तीचा ८० टक्के खर्च कमी झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

बृहन्मुंबई क्षेत्रातील पावसाळापूर्व कामांचा आढावा घेणारी बैठक उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून घेतली. यावेळी मुंबईच्या महापौर रितु तावडे, उपमहापौर संजय घाडी, गटनेते अमेय घोले, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, उपमुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे आदी यावेळी उपस्थित होते.

तसेच, केंद्र व राज्य शासनाच्या विविध प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांची देखील या बैठकीला उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने मध्य व पश्चिम रेल्वे, भारतीय हवामान विभाग, भारतीय तटरक्षक दल, नौसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ), मुंबई पोलीस, महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा), मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व वाहतूक (बेस्ट) आदी यंत्रणांचा समावेश होता.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, बृहन्मुंबई महानगरपालिकेसह अन्य विभागांनी केलेले नियोजन मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी उपयुक्त ठरणार असून अजून ज्या भागात नालेसफाईचे काम पूर्ण झाले नाही तेथे सफाईचे काम तातडीने पूर्ण करून घ्यावे. पाऊस लांबल्याने यंत्रणांना तयारीसाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे. होल्डींग पाँड, फ्लड गेट कार्यरत करावे. बेस्ट, एसटीने पर्यायी वाहतुक व्यवस्थेचे नियोजन करावे. झाड कोसळून दुर्घटना होण्याचे प्रमाण रोखण्यासाठी महानगरपालिकेने अधिकची दक्षता घेतली पाहिजे. रेल्वेने रेल्वे ट्रॅकखालच्या नाल्यांची सफाई योग्य पद्धतीने करावी. झोपडपट्टी भागातील पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने झाल्यास त्या भागात जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यामध्ये औषधांचा साठा करून ठेवावा. मेट्रो स्थानकांमध्ये पाणी साचणार नाही, याची खबरदारी घ्यावी. एनडीआरएफ, नौदल, वायुदल, लष्कर यांची प्रत्येकवेळी आपल्याला मदत होत असते. यांच्याशी समन्वय ठेवून आपत्ती काळात मुंबईकरांना दिलासा द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

मुंबई शहरात १२५ पर्जन्यमापक यंत्रे असून यावर्षी जून ते सप्टेंबर या काळात भरतीचे (साडेचार मीटर) २४ दिवस आहेत. ९३४ ठिकाणी पाणी उपसण्याचे पंप बसविण्यात आले असून ६५ मिनी पंपींग स्टेशन आहेत. पंपींग स्टेशनच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा स्मार्ट पंप व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षातून त्याचे संनियंत्रण केले जाणार आहे. मुंबईत १००० आपदा मित्र, एनडीआरएफची ३ पथके, नौदलाची ९ पथके तैनात आहेत, अशी माहिती यावेळी महानगरपालिकेकडून सादर करण्यात आली.

***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here