Home मुंबई *वृक्षराजीने नटलेली, स्वच्छ आणि सुंदर मुंबई घडविण्यासाठी मुंबईकर नागरिकांनी पुढाकार घ्यावा –...

*वृक्षराजीने नटलेली, स्वच्छ आणि सुंदर मुंबई घडविण्यासाठी मुंबईकर नागरिकांनी पुढाकार घ्यावा – महापौर रितू तावडे यांचे आवाहन*

9
0

*विविध ठिकाणी मिळून १७ हजार ०४७ वृक्ष लागवड उपक्रमाचा महापौर  रितू तावडे यांच्या हस्ते शुभारंभ*

केंद्र शासनाच्या ‘एक वृक्ष आईच्या नावे’ (एक पेड माँ के नाम) या अभियानात प्रत्येक नागरिकाने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. सार्वजनिक ठिकाणी किमान एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन आणि संगोपन करण्याचा संकल्प करावा. या उपक्रमासाठी आवश्यक रोपे, माती आणि अन्य सुविधा महानगरपालिकेकडून उपलब्ध करून दिल्या जातील. वाढत्या नागरिकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अधिकाधिक हरित क्षेत्राची निर्मिती करणे, ही काळाची गरज आहे. वृक्ष हे पर्यावरण संतुलनाचे आधारस्तंभ असून हिरवाईने नटलेली मुंबई हीच भावी पिढ्यांसाठीची अमूल्य देणगी ठरेल. त्यामुळे वृक्षराजीने नटलेली, स्वच्छ आणि सुंदर मुंबई घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुंबईच्‍या महापौर रितू तावडे यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्‍त मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या शुभहस्ते विविध ठिकाणी मिळून सुमारे १७ हजार ०४७ वृक्षांच्या लागवड उपक्रमाचा शुक्रवार दि ५ जून २०२६) सकाळी शुभारंभ करण्यात आला. त्‍यात वाशी जकात नाका, पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड (पूर्व) मध्ये मोरया तलावाजवळ, नाहूर (पूर्व) येथे भांडुप उदंचन केंद्रालगत, कांजूरमार्ग क्षेपणभूमी, घाटकोपर (पूर्व) मधील कॅसुरीना हाउसिंग सोसायटी जवळ आणि घाटकोपर (पूर्व) स्थित चित्तरंजन मैदान आदी ठिकाणांचा समावेश आहे. मुंबई अधिक हिरवीगार, पर्यावरणपूरक आणि शाश्वत बनविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे यावेळी महापौर तावडे यांनी अधोरेखित केले.

मुंबई महानगराच्या प्रमुख प्रवेशमार्गांपैकी एक असलेल्या वाशी नाका परिसरात महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते बहावा वृक्षाची लागवड करून वृक्षारोपण मोहिमेचा सकाळी शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दुतर्फा मुलुंड ते घाटकोपर दरम्यान १ हजार वृक्षांची लागवड करण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमालाही महापौरांच्‍या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या अंतर्गत, पंतनगर ते मुलुंड दरम्यान पूर्व द्रुतगती महामार्गालगत एन, एस आणि टी या तीनही प्रभागांच्या हद्दीत पिवळ्या बहावा वृक्षांची लागवड करण्याचा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमामुळे येत्या काळात पूर्व द्रुतगती महामार्ग परिसर अधिक आकर्षक, निसर्गरम्य आणि पर्यावरणपूरक बनण्यास मदत होणार आहे.

तसेच, मुंबईच्या हरित क्षेत्रात मोठी भर घालण्यासाठी कांजूर क्षेपणभूमी येथे तब्बल १६ हजार वृक्ष लागवडीच्या व्यापक मोहिमेचाही शुभारंभ महापौर तावडे यांच्या हस्ते करण्यात आला. विविध ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या या वृक्षारोपण उपक्रमांमुळे मुंबईच्या हरित आच्छादनात लक्षणीय वाढ होऊन पर्यावरण संवर्धनाला बळकटी मिळणार असल्याचा विश्वास महापौर तावडे यांनी व्यक्त केला.

ठिकठिकाणी झालेल्‍या या वृक्षारोपण अभियानास एम पूर्व विभागाच्‍या प्रभाग समिती अध्यक्ष खैरनुसा अकबर हुसेन,स्थानिक नगरसेवक जमीर कुरेशी, स्थानिक नगरसेवक दिनेश पांचाळ, स्थानिक नगरसेविका रोशन शेख, स्थानिक नगरसेविका शबाना काजी, एम पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता तथा सहायक आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) भास्कर कसगीकर, टी विभागाच्या सहायक आयुक्त योगिता कोल्हे, एस विभागाचे कार्यकारी अभियंता तथा सहायक आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) मयूर भामरे, एन विभागाचे सहायक आयुक्त श्री. मारुती पवार, उप उद्यान अधीक्षक सुनील राठोड, सहायक उद्यान अधीक्षक ऋषिकेश हेंद्रे यांच्‍यासह संबंधित अधिकारी, नागरिक, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here