Home राजकीय कधीकाळी याचकाच्या भूमिकेत असलेल्या भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

कधीकाळी याचकाच्या भूमिकेत असलेल्या भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

19
0

मोदी सरकारच्या तपपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

मुट
‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाचे प्रकाशन

जो देश कधी याचकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळायचा तो देश मोदी सरकारच्या बारा वर्षांच्या कार्यकाळात आत्मनिर्भर भारत म्हणून जगाच्या पाठीवर स्वाभिमानाने उभा असलेला पहावयास मिळत आहे. एखाद्या देशाचा अभिमान आणि आत्माभिमान जागृत करून एक मोठे परिवर्तन कसे घडवले जाऊ शकते ते गेल्या बारा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले. या काळात मोदींनी या देशाचा असा भक्कम पाया रचला आहे की यापुढे सातत्याने त्यावरच्या इमारतीवर मजलेच चढत आपण पुढेच जाणार. आता पाठीमागे जाण्याचे काहीच कारण नाही. अर्थव्यवस्था म्हणून भारताने केलेली ही प्रगती थक्क करणारी आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी काढले. रविंद्र नाट्य मंदिर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, आ. योगेश सागर, आ. निरंजन डावखरे, राजेश पांडे, आ. संजय कुटे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. अमित साटम आदी मान्यवर उपस्थित होते.
नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याच्या घटनेला मंगळवारी एक तप पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विशेषांकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील गेल्या १२ वर्षांतील देशाचा विकासप्रवास, महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय आणि विविध क्षेत्रांतील कामगिरीचा सविस्तर लेखाजोखा मांडण्यात आला आहे.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ घेऊन उद्या बारा वर्षे पूर्ण होतील. या कालावधीत गरिबांना घर, शौचालय उपलब्ध करून देणे असा गरीब केंद्रित कारभार झाला. त्यामुळे दहा वर्षांमध्ये भारताने २५कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याबद्दल संयुक्त राष्ट्राने आपल्या अहवालात कौतुक केले. अर्थव्यवस्था म्हणून भारताने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. भारताचा जीडीपी ३०१३-१४ साली १०३ लाख कोटी होता, तो जीडीपी आज ३५७ लाख कोटीपर्यंत पोहोचलाय. म्हणजे दहा वर्षांमध्ये आपला जीडीपी तिपटीने वाढला आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर साधारणपणे २०१३ -१४ मध्ये जो जीडीपी १३ लाख कोटींचा होता तो आता ५४ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची ही वाढ मोदींनी देशाच्या अर्थकारणात आणलेल्या बदलामुळे शक्य झाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
युपीएच्या सरकारमध्ये मानसिकता अशी होती की आम्ही लोकांसाठी योजना तयार करू आणि जे काही आहे ते अनुदानाच्या स्वरूपात लोकांना देऊन त्याच्यावर लोकांनी जगले पाहिजे. आम्ही नवीन संधी निर्माण करणार नाही, आम्ही देशाच्या विकासावर, देशामध्ये पायाभूत सुविधा तयार करण्यावर कोणताही खर्च करणार नाही. लोकांना आपल्यावर अवलंबित करून अनुदानप्रणित अर्थव्यवस्था त्या काळात तयार झाली होती आणि त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू अर्थव्यवस्थेच्या ताणामुळे आपण संधी निर्माण करू शकलो नाही. म्हणून मोदींनी अर्थव्यवस्था तयार केली की ज्यात गुंतवणुकीच्या माध्यमातून संधी तयार होतील. त्या संधीच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था विस्तारित होऊन देशाच्या तिजोरीत पैसा येईल आणि आलेल्या पैशाच्या उपयोग करताना गरीब कल्याणाचा अजेंडा चालवून देशातली गरिबी दूर करून त्याला आपल्या पायावर उभा करण्याचे काम देशातील सरकार करेल. आज आपण जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो. लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था होऊ. हा जो काही विस्तार आहे हा केवळ घोषणांनी झालेला नाही. त्याच्या पाठीमागे एक मोठी विस्तृत धोरण आणि विकासाचा कार्यक्रम पंतप्रधानांनी उभा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला वेगळी दिशा कशी देता येईल, जगासमोर भारत देश सर्वश्रेष्ठ म्हणून नावारूपाला कसा येईल या दृष्टिकोनातून जे करता येऊ शकते ते ते करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देशभरात भ्रष्टाचाराविरोधात एक जनआंदोलन उभे केले. देशात या काळात पारदर्शक कारभार कसा होईल याची दखल घेतली आणि पार्लमेंट टू पंचायत या सगळ्या व्यवस्थेकडे त्यांनी लक्ष दिले. त्यांच्यामुळे समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारच्या योजना जात आहेत. त्यांच्या असंख्य योजना एका पुस्तकात मांडता येणार नाहीत इतक्या त्या व्यापक आहेत. स्वच्छ भारत योजनेपासून एलपीजी लाभार्थ्यांना लाभ सोडून देण्याचे आवाहन करत तो लाभ त्यांनी देशाला मिळवून दिला हे क्रांतिकारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here