Home मुंबई *प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर (ऑन फिल्ड) असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी चौक्यांवर निर्जलीकरण भुकटी (ओआरएस पावडर)...

*प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर (ऑन फिल्ड) असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी चौक्यांवर निर्जलीकरण भुकटी (ओआरएस पावडर) आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी*

50
0

*• महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश*

*• उष्माघात टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे कर्मचाऱ्यांना आवाहन*

उष्माघात, निर्जलीकरण (डिहायड्रेशन) आणि उष्णतेमुळे होणाऱ्या इतर आरोग्य समस्यांपासून कर्मचाऱ्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच, वाढत्या उष्णतेच्या प्रभाव लक्षात घेता, प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर (ऑन फिल्ड) कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी चौक्यांवर निर्जलीकरण भुकटी (ओआरएस पावडर) आणि पिण्याच्या पाण्याची योग्यप्रकारे व्यवस्था करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.

तथापि, प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर कार्यरत असलेल्या विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. अशा परिस्थितीमध्ये आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन देखील भिडे यांनी केले आहे.

मुंबईतील वाढत्या उष्णतेच्या अनुषंगाने, महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. उष्माघाताच्या रुग्णांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, उष्माघातापासून बचावासाठी करावयाच्या उपायोजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर (ऑन फिल्ड) कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनाने विविध उपाययोजना करण्याचे निर्देश अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.

महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी सांगितले की, विविध विपरित परिस्थितींमध्ये देखील महानगरपालिकेचे कर्मचारी कर्तव्य पार पाडत असतात. मुंबईत स्वच्छता अबाधित राखण्यासाठी सुमारे ४० हजार स्वच्छता कर्मचारी अहोरात्र कार्यरत असतात. मात्र, सध्या वाढत्या तापमानामुळे उष्माघात, निर्जलीकरण (डिहायड्रेशन) आणि इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष कार्यस्थळी (ऑन फिल्ड) कार्यरत स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सर्व चौक्यांमध्ये तात्काळ पुरेशा प्रमाणात निर्जलीकरण भुकटी (ओआरएस पावडर) आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तसेच, याबाबत नियमित देखरेख ठेवावी, असे निर्देश भिडे यांनी दिले आहेत.

***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here