मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आल्याने पालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला वेग दिला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी शुक्ला (वय ३८) आणि तक्रारदार महिला यांची ओळख विक्रोळीतील बिल्डिंग प्रपोजल विभागात काम करत असताना झाली. कामाच्या निमित्ताने सुरू झालेली ओळख हळूहळू जवळिकीमध्ये बदलली. याच काळात शुक्लाने आपल्या वैवाहिक आयुष्यातील अडचणींचा दाखला देत पत्नीपासून विभक्त होण्याचा विचार असल्याचे सांगितले आणि त्या महिलेवर विश्वास बसवून तिला लग्नाचे आश्वासन दिले.
या आश्वासनावर विश्वास ठेवून महिलेने त्याच्यासोबत संबंध ठेवले. मात्र कालांतराने शुक्ला लग्नाचा विषय टाळत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीनंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ६९ अंतर्गत गुन्हा नोंदवत शुक्लाला अटक केली आहे. सध्या पोलीस त्याची सखोल चौकशी करत असून या प्रकरणातील प्रत्येक पैलू तपासले जात आहेत. तपासादरम्यान आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, नितीन शुक्ला यांनी यापूर्वी एफ-नॉर्थ वॉर्डमध्ये प्रभाग अधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर त्यांच्याकडे के-ईस्ट वॉर्डचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आणि पुढे त्यांची पूर्णवेळ सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्यावर असे गंभीर आरोप झाल्याने प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आता या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





















