*विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बैठक संपन्न*
” भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशांनुसार, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात मतदार यादीसाठी विशेष सखोल पुनरिक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात एसआयआर) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम बृहन्मुंबई क्षेत्रात अत्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी लोकप्रतिनिधींसह राजकीय पक्षांनी सहकार्य करावे.” असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले आहे.
विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या अनुषंगाने, विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात शुक्रवार (दि. २४ एप्रिल २०२६) रोजी बैठक पार पडली.त्यावेळी भिडे बोलत होत्या.
विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध गटनेते, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची यावेळी उपस्थिती होती.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, महानगरपालिका सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार आदी यावेळी उपस्थित होते.
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत बैठकीच्या सुरुवातीला संगणकीय सादरीकरणाद्वारे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच, विविध बाबींवर चर्चाही करण्यात आली.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या की, “महाराष्ट्रात यापुर्वी सन २००२ मध्ये म्हणजेच सुमारे २४ वर्षांपुर्वी विशेष सखोल पुनरिक्षण करण्यात आले होते. स्थलांतर, दुबार नोंदणी, मृत मतदार किंवा परदेशी नागरिकांची बेकायदेशीर नाव नोंदणी आदी कारणांमुळे मतदार यादीत सुधारणा करणे आवश्यक असते. याच अनुषंगाने, महाराष्ट्रातील अन्य भागांसोबतच बृहन्मुंबई क्षेत्रातदेखील विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पुनरिक्षण पुर्व कालावधी, गणना (एन्युमरेशन) कालावधी, एएएसडी (ऑलरेडी एनरोल्ड, अबसेंट, शिफ्टेड, डेड) यादी तयार करणे, प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, दावे व हरकती कालावधी व अंतिम मतदार यादी प्रसिद्धी अशा एकूण सहा टप्प्यांत हा विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. बृहन्मुंबई क्षेत्रात (मुंबई शहर आणि मुंबई उपनगरे) सध्या पुनरिक्षण पुर्व कालावधी अंतर्गत मतदारांचे मॅपिंग करण्याचे कामकाज सुरू आहे. त्यानुसार, विशेष सखोल पुनरिक्षण-२००२ च्या मतदार यादीतील मतदारांचा सन २०२४ च्या मतदार यादीतील तपशील शोधून बीएलओ ऍपमध्ये मॅपिंग केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, बृहन्मुंबई क्षेत्रात विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी राजकीय पक्षांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. महानगरपालिकेने या कामकाजासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) नेमणूक केली आहे. याच धर्तीवर, पुनरिक्षण प्रक्रिया अधिक प्रभावीपणे, पारदर्शकपणे आणि लवकर पुर्ण करण्याच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी संबंधित स्थानिक भागांत मतदान केंद्रस्तरीय सहायकांची (बीएलए) नेमणूक करावी, असे आवाहनदेखील अश्विनी भिडे यांनी यावेळी केले.
****
















