Home मुंबई *नाशिक येथे कामाच्या ठिकाणी महिलांचे सक्तीने धर्मांतरण व लैंगिक शोषण झाल्याप्रकरणी दोषींवर...

*नाशिक येथे कामाच्या ठिकाणी महिलांचे सक्तीने धर्मांतरण व लैंगिक शोषण झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईच्या सूचना — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*

12
0

मुंबई, दि. १३ एप्रिल २०२६ : नाशिक शहरात उघडकीस आलेल्या कामाच्या ठिकाणी महिलांचे सक्तीने धर्मांतरण व लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांना सविस्तर निवेदन देत सखोल चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची सूचना दिली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले आहे की, या प्रकरणामुळे समाजामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक सलोखा, महिलांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः कामाच्या ठिकाणी महिलांचे सक्तीने धर्मांतर व लैंगिक शोषण यांसारख्या गंभीर बाबी समोर येत असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांनी काही महत्त्वाच्या उपाययोजना सुचविल्या आहेत. प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून (SIT) संपुर्ण प्रकरणाची बारकाईने चौकशी करून त्यामागील संभाव्य सूत्रधार व संघटित जाळ्याचा शोध घेण्याचे निर्देश द्यावेत, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल चॅट्स, आर्थिक व्यवहार यांसारख्या तांत्रिक पुराव्यांची तपासणी करून दोषींची साखळी उघड करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे, असेही त्यांनी नमूद केले. यासोबतच पीडितांना तत्काळ पोलीस संरक्षण, मोफत कायदेशीर मदत, समुपदेशन व मानसिक आधार सेवा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी सर्व खासगी व कॉर्पोरेट संस्थांमध्ये अंतर्गत तक्रार समित्या प्रभावीपणे कार्यरत ठेवण्याच्या सूचना देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. तसेच शहरातील आयटी कंपन्या व इतर संस्थांमध्ये नियमित सुरक्षा ऑडिट व अचानक तपासण्या करून अशा प्रकारांना आळा घालण्याचे आवाहन त्यांनी केले.

धर्मांतराच्या नावाखाली कोणतेही बेकायदेशीर प्रकार घडत असल्यास त्यावर कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. याशिवाय महिला सुरक्षा व कायदेशीर हक्कांविषयी पोलीस विभागामार्फत व्यापक जनजागृती मोहीम राबवून समाजातील विविध घटकांमध्ये समन्वय वाढवण्यावर त्यांनी भर दिला.

या संपुर्ण प्रकरणात तत्काळ आणि प्रभावी कार्यवाही करून न्याय मिळवून देण्याची सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here