खेड – खेड तालुक्यातील फुरूस–पोयनार मार्गावरील सुमारे ८० वर्षांपुर्वी बांधलेला जुना पूल बांधकाम विभागाने नुकताच पाडला असून, त्याठिकाणी नवीन पुलाचे काम वेगाने सुरू आहे. सध्या दोन जेसीबी मशीनच्या सहाय्याने हे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून येत आहे.मात्र, पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे फळसोंडा परिसर आणि पोयनार गावाचा परस्परांतील संपर्क पुर्णपणे तुटला आहे. पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या प्रशासनाकडून केवळ पायवाट स्वरूपात तात्पुरता मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र या मार्गावरून रिक्षा किंवा चारचाकी वाहने जाऊ शकत नसल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. परिणामी, ग्रामस्थांना दैनंदिन कामांसाठी पायीच प्रवास करावा लागत आहे.
विशेषतः शाळकरी मुलांना दररोज पायपीट करावी लागत असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत वाहनांची सोय नसल्याने मोठा धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


















