Home मुंबई *आश्विनी भिडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार स्‍वीकारला*

*आश्विनी भिडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार स्‍वीकारला*

15
0

*बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला सनदी अधिकारी*

ज्येष्ठ सनदी अधिकारी आश्विनी भिडे यांनी मावळते महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार मंगळवार दि. ३१ मार्च रोजी सायंकाळी स्‍वीकारला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी विराजमान होणाऱ्या भिडे या पहिल्या महिला सनदी अधिकारी आहेत.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपीन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त यांचे कार्यालय) प्रशांत गायकवाड यावेळी उपस्थित होते.

अश्विनी भिडे या भारतीय सनदी सेवेतील १९९५ च्‍या तुकडीतील अधिकारी असून त्‍यांना सनदी सेवेचा सुमारे ३१ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत महाराष्‍ट्रात विविध महत्‍त्‍वपूर्ण पदांचा कार्यभार सांभाळला आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयाच्‍या अतिरिक्त विभागीय आयुक्‍त, महाराष्‍ट्र शासनामध्‍ये सह सचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एम.एम.आर.डी.ए.) अतिरिक्त महानगर आयुक्त, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्‍या सचिव, माननीय मुख्यमंत्री यांच्या अपर मुख्य सचिव म्‍हणून आश्विनी भिडे यांनी काम पाहिले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालक म्हणून त्‍यांनी मुंबईत मेट्रो रेल्वेचे जाळे निर्माण करण्‍यात महत्त्‍वाचे योगदान दिले आहे.

आश्विनी भिडे यांनी यापुर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेत दि ९ मे २०२० ते दि१९ मार्च २०२४ या कालावधीत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) या पदावर कार्य केले आहे. मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाच्या पुर्णत्वामध्ये देखील भिडे यांचे महत्त्वपुर्ण योगदान राहिले आहे.

दरम्यान, विविध ठिकाणी विविध पदांवर असताना केलेल्‍या उल्लेखनीय कार्यांबद्दल त्‍यांना विविध संस्था-संघटनांकडून पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here