*‘शिवकल्याण राजा’ स्वरसोहळाही होणार*
*सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांचे निवेदन*
मुंबई
महाराष्ट्राच्या गौरवशाली सांस्कृतिक वारशाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्शन घडविणारा भव्य ड्रोन शो मुंबईतील आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सुमारे २,००० ड्रोनच्या सहाय्याने आकाशात विविध ऐतिहासिक दृश्ये आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे सादरीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी विधानसभा सभागृहात निवेदन करुन दिली.
हा भव्य कार्यक्रम दि. २६ व २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७.०० ते १०.०० या वेळेत आझाद मैदान येथे पार पडणार असून महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचा आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार सादर केला जाणार आहे.
या कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत सादर होणारा ‘शिवकल्याण राजा’ हा भव्य स्वरसोहळा. इतिहासाची महती आणि सुरांचा संगम असलेल्या या कार्यक्रमामुळे आझाद मैदान परिसरात चैतन्यमय आणि भारलेले वातावरण निर्माण होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.”असे आवाहन मंत्री शेलार यांच्याकडून करण्यात आले आहे.





















