नवी दिल्ली
नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने प्रारंभ २०२६ या देशव्यापी मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमेचा उद्देश नागरिकांना आगामी नवीन इन्कम टॅक्स कायद्याबद्दल जागरूक करणे, त्याचे फायदे समजावून सांगणे आणि करप्रणाली अधिक पारदर्शक व सोपी करणे हा आहे.
सरकारने स्पष्ट केले आहे , “नवीन कायद्यात कर दरांचे सरलीकरण, डिजिटल फाइलिंगची सुलभता, करदात्यांसाठी तक्रार निवारण यंत्रणा यावर विशेष भर दिला जाईल. या मोहिमेद्वारे देशभरात जनजागृती शिबिरे, कार्यशाळा, ऑनलाइन वेबिनार्स आयोजित केले जातील. करदात्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळावीत यासाठी विशेष हेल्पलाइन व पोर्टल सुरू करण्यात येणार आहे.”
अधिकाऱ्यांच्या मते, या मोहिमेचा उद्देश फक्त कर संकलन वाढवणे नाही, तर करदात्यांचा विश्वास जिंकणे आणि करप्रणालीला नागरिकाभिमुख बनवणे हा आहे. ग्रामीण भागात विशेष लक्ष देऊन मराठी, हिंदी, बंगाली, तमिळ यांसारख्या प्रादेशिक भाषांमध्ये माहितीपत्रके वितरित केली जातील.
तज्ज्ञांचे मत आहे की, नवीन कायदा लागू झाल्यानंतर लघु व मध्यम उद्योगांना करसवलती, तर सामान्य करदात्यांना सोप्या स्लॅब्स मिळतील. यामुळे करप्रणाली अधिक न्याय्य होईल. सरकारने जाहीर केले आहे की, प्रारंभ २०२६ ही मोहीम पुढील सहा महिन्यांपर्यंत चालेल आणि त्यानंतर नवीन कायदा टप्प्याटप्प्याने लागू केला जाईल.




















