Home मुंबई *आरोग्य विभाग ‘राम भरोसे’; जाहिराती मोठ्या पण प्रत्यक्ष सुविधा शून्य!*

*आरोग्य विभाग ‘राम भरोसे’; जाहिराती मोठ्या पण प्रत्यक्ष सुविधा शून्य!*

28
0

*गडचिरोली-चंद्रपूरसह राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका*
मुंबई, दि.२३:
सरकार एकीकडे मोठ्या योजनांच्या जाहिराती करत आहे, मात्र दुसरीकडे राज्यातील विशेषतः दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. रिक्त पदे, बजेटमधील कपात आणि औषध खरेदीतील भ्रष्टाचाराने आरोग्य विभाग ‘राम भरोसे’ सुरू आहे, अशा शब्दांत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज सरकारला धारेवर धरले

.
विधानसभेत विरोधकांच्या २९३ च्या प्रस्तावावर बोलताना आरोग्य विभागातील त्रुटी वडेट्टीवार यांनी अनेक गंभीर बाबी पुराव्यासह मांडल्या.
CAG च्या अहवालानुसार राज्यात २७% डॉक्टर आणि ३५% नर्सची पदे रिक्त आहेत. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात डॉक्टरांची कमतरता असल्याने रुग्णांना देवाच्या भरवशावर राहावे लागते. मोफत उपचार केवळ कागदावर असून प्रत्यक्षात डॉक्टरच उपलब्ध नाहीत,अस वडेट्टीवार म्हणाले.

सरकार पायाभूत सुविधांवर,मोठ्या मोठ्या महामार्गाच्या प्रकल्पांवर बजेटच्या ४०% खर्च करत असताना आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहे. ग्रामीण आरोग्यासाठी गेल्या वर्षी २६६० कोटींची तरतूद होती, ती आता थेट १४३० कोटींवर आली आहे.म्हणजे आरोग्याच्या बजेटमध्ये ४४% कपात झाली आहे. अशी स्थिती असेल तर मग गरिबांना न्याय कसा मिळणार? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

नाशिक आणि मालेगाव येथील रुग्णालयांच्या कामात बोगस परवाना असलेल्या कंपन्यांना कोट्यवधींची कंत्राटे देण्यात आली आहेत. रायगडमध्ये पुरवठा करण्यात आलेले ७१ हजार सिरपच्या बाटल्या निकृष्ट दर्जाच्या होत्या. गडचिरोलीत २४ कोटींच्या औषध खरेदीत झालेला गैरव्यवहार गंभीर असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली.

गडचिरोली जिल्ह्यात आजही अनेक गावांत रस्ते नाहीत. आदिवासी रुग्णांना खांद्यावर किंवा काठीला बांधून नाल्यातून न्यावे लागते. मुख्यमंत्री स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही आदिवासी बांधवांचा रस्त्यातच जीव जात आहे, ही राज्यासाठी शरमेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यात २२ रुग्णवाहिका नादुरुस्त आहेत. दुरुस्तीसाठी आणि इलेक्ट्रीक बिल भरायलाही रुग्णालयांकडे पैसे नाहीत. दुसरीकडे राज्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर झाला असून एकट्या पूर्व विदर्भात ९९ हजार बालके कुपोषित आहेत. रुग्णालयांच्या आवारात मेडिकल माफिया:
शासकीय रुग्णालयात औषधे मोफत देण्याचे धोरण असताना रुग्णालयाच्या जागेत खासगी मेडिकल दुकानांना जागा का दिली जाते? डॉक्टरांकडून ४०% कमिशनसाठी विशिष्ट दुकानातूनच महागडी औषधे घेण्याची सक्ती केली जात असून गरिबांची लूट सुरू आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

२९३च्या प्रस्तावाच्या माध्यमातून काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी
रिक्त असलेली डॉक्टरांची आणि कर्मचाऱ्यांची पदे तात्काळ भरावीत.
२४ कोटींच्या औषध खरेदीतील गैरव्यवहाराची आणि बोगस कंपन्यांना दिलेल्या कंत्राटांची निष्पक्ष चौकशी व्हावी.
महात्मा जोतिबा फुले आणि आयुष्मान भारत योजनेचे ऑडिट करून रुग्णांना खरोखर लाभ मिळतो की नाही, हे तपासावे.
तसेच दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांच्या इमारतींची दुरुस्ती करून रुग्णवाहिकांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here