Home पुणे *लोणीकंद हुंडाबळी प्रकरणाची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल, पुणे पोलीस...

*लोणीकंद हुंडाबळी प्रकरणाची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल, पुणे पोलीस आयुक्तांना दिले निवेदन*

27
0

*महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही!- डॉ. गोऱ्हे*

पुणे
पुणे जिल्ह्यातील लोणीकंद परिसरात घडलेल्या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मृत विवाहिता वैष्णवी यशवंत लाटे हिच्या कथित हुंडाबळीच्या प्रकरणात आरोपींविरुद्ध कठोर आणि तातडीने कारवाई करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे केल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्यात दि. १५ मार्च २०२६ रोजी या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची भावना व्यक्त होत असून प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत निष्पक्ष आणि सखोल तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.

आपल्या निवेदनात डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले आहे की, वरिष्ठ व अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाचा तपास करण्यात यावा तसेच संबंधित आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी. मृत विवाहिता वैष्णवी हिच्या कुटुंबाला आवश्यक ते संरक्षण व सहकार्य देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

तसेच, “विवाहितेने कोणती सुसाईड नोट लिहिली आहे का, तिचे शेवटचे फोन संभाषण काय झाले होते, तसेच छळासंदर्भातील सर्व बाबींची तपासात सखोल चौकशी करून आवश्यक पुरावे गोळा करावेत, असेही त्यांनी सुचविले आहे. या प्रकरणात आधुनिक फॉरेन्सिक तंत्रांचा वापर करून तपास अधिक प्रभावीपणे करावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. हुंड्याच्या मागणीसंदर्भातील वस्तू जप्त करून त्याबाबतचे पुरावे तपासात समाविष्ट करण्यावरही त्यांनी भर दिला आहे.
“तपास पुर्ण करून लवकरात लवकर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात यावे, तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याबाबत प्रयत्न करावेत.”अशी सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी पोलीस प्रशासनाला केली आहे.

“महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करत अशा प्रकरणांमध्ये दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रशासनाने तातडीने आणि प्रभावी कारवाई करावी.” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here