Home मुंबई *CSW 70 च्या पार्श्वभूमीवर महिला सक्षमीकरणाच्या दिशेने जागतिक उपक्रम, उपसभापती डॉ. नीलम...

*CSW 70 च्या पार्श्वभूमीवर महिला सक्षमीकरणाच्या दिशेने जागतिक उपक्रम, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन*

34
0

*शाश्वत विकास उद्दिष्टे आणि महिलांविरुद्ध हिंसाचार प्रतिबंधावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मंथन*

मुंबई
संयुक्त राष्ट्रांच्या Commission on the Status of Women (CSW-70) या जागतिक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर “SDGs and Mitigation of VAW: Weaving Ways for Empowerment” या विषयावर १७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता विशेष समांतर (Parallel event )चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती तथा स्त्री-आधार केंद्र, पुणे यांच्या मानद अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.

महिला सक्षमीकरण, शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) आणि महिलांवरील हिंसाचार (VAW) कमी करण्यासाठी आवश्यक धोरणे व उपाययोजना या विषयांवर या चर्चासत्रात चर्चा होणार आहे. स्त्री-आधार केंद्राच्या विश्वस्त अपर्णा पाठक या लिंग, सामाजिक-आर्थिक, पुनरुत्पादक व हवामान विषयक अन्याय कमी करण्यावर भाष्य करतील. लोकसभा सदस्या डी. पुरंदेश्वरी या महिलांवरील हिंसाचार कमी करण्यासाठी सर्वोत्तम अर्थसंकल्पीय पद्धती व निर्भया योजनांचा आढावा मांडतील. ओडिशा विधानसभेच्या अध्यक्षा सुरमा पाधी या महिलांना दर्जेदार आरोग्य-शिक्षण व संरक्षण मिळण्यासाठी कायदे बळकट करण्यावर बोलतील.

राष्ट्रीय महिला चळवळीच्या अभ्यासक डॉ पॅम राजपूत या CEDAW च्या संदर्भात पीडितांना न्यायप्रवेश वाढविणे व भेदभावमुक्त प्रणाली विकसित करण्याबाबत मार्गदर्शन करतील. स्त्री-आधार केंद्राच्या विश्वस्त श्रीमती जेहलम जोशी संस्था व तिच्या कार्याचा आढावा देतील. क्षेत्रीय कार्यकर्त्या अंजु वाघमारे व लहानू आबनावे या क्षेत्रीय अनुभव मांडतील. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे हे लिंगसमभावाधारित हिंसाचाराच्या संदर्भात पोलीस व न्यायव्यवस्थेच्या प्रशिक्षणावर भाष्य करतील. लंडनस्थित श्रीमती रेणूका फडके आर्थिक जागृतीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर तर महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे लिंगसमभाव व कुटुंबातील विविधतेच्या संदर्भातील उपक्रम मांडतील.
या चर्चासत्रात डॉ. नीलम गोऱ्हे या महिलांवरील विविध प्रकारच्या हिंसाचाराला तोंड देण्यासाठी व्यापक कायदेशीर सुधारणा आणि समावेशक न्यायव्यवस्था उभारण्याच्या गरजेवर मार्गदर्शन करणार असून कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अपर्णा पाठक व आभार प्रदर्शन मुग्धा केसकर करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here