Home मुंबई *समर्पित भावनेने समाजाची सेवा करण्याचा मालपाणी दाम्पत्याचा आदर्श नव्या पिढीने अंगीकारावा –...

*समर्पित भावनेने समाजाची सेवा करण्याचा मालपाणी दाम्पत्याचा आदर्श नव्या पिढीने अंगीकारावा – प्रकाश आबिटकर*

45
0

*’ मा आयव्हीएफ केंद्र’ चे लोकार्पण सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न*

*मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी हा अभिमानाचा क्षण – महापौर श्रीमती रितू तावडे*

गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि सर्वसामान्यांसाठीचे तंत्रज्ञान परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणे, हे आरोग्य सेवेत समाजाच्या प्रत्येक घटकाला अभिप्रेत आहे. शासनाच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सेवा अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न आहे. शासकीय योजनांची व्याप्ती वाढवतानाच रुग्णांना वैद्यकीय लाभ मिळवून देण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. आयव्हीएफ केंद्राच्या माध्यमातून आपल्या संस्था आणि समाजाला समर्पित भावनेतून सेवा पुरवण्याची तळमळ मालपाणी दाम्पत्याच्या आयव्हीएफ केंद्रातून दिसून येते, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात आज (दिनांक २३ फेब्रुवारी २०२६) आयोजित मा आयव्हीएफ केंद्राचे लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. आपण आयुष्यात यशस्वी झाल्यानंतरही समर्पित भावनेने समाजाची सेवा करण्याचा मालपाणी दाम्पत्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा, असेही मंत्री श्री. आबिटकर यावेळी म्हणाले.

केईएम रुग्णालयातील नवीन आयव्हीएफ विभाग लोकार्पण प्रसंगी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले.
व्यंध्यत्वावर उपचार खर्चिक तंत्र मानले जाते. मात्र आता केईएमच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरात ही सुविधा उपलब्ध होणार आहे, असे सांगून महापौरांनी आयव्हीएफ सेंटरसाठी योगदान देणाऱ्या डॉ. अंजली मालपाणी आणि डॉ. अनिरुद्ध मालपाणी यांचे विशेष कौतुक केले. “आजच्या काळात अनेक माता-पित्यांना अपत्यप्राप्तीची तीव्र इच्छा असते. त्या स्वप्नाला साकार करण्याचे पुण्यकार्य या केंद्राच्या माध्यमातून होणार आहे. अशा दर्जेदार केंद्रामुळे भविष्यात हजारो कुटुंबांच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल,” असे त्यांनी नमूद केले.

अपत्यासाठी प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्यासाठी इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) प्रसूतीची कृत्रिम गर्भधारणा उपचार पद्धती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय व सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय यांच्या माध्यमातून अतिशय माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृत्रिम गर्भधारणा (आयव्हीएफ प्रसूती) च्या इतिहासात स्त्री रोग विभागात ४० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या सेवेचे पुनरूज्जीवन कृत्रिम गर्भधारणा केंद्राच्या निमित्ताने करण्यात आले.

याप्रसंगी मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार अजय चौधरी, विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर, नगरसेवक किरण तावडे, नगरसेविका श्रद्धा जाधव, नगरसेवक सचिन पडवळ, नगरसेविका सुप्रिया दळवी, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय व गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, मा आयव्हीएफ केंद्राच्या श्रीमती अंजली मालपाणी आणि श्री. अनिरुद्ध मालपाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

केईएम रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेऊन व्यंधत्व निवारण क्षेत्रात डॉ. अंजली मालपाणी आणि श्री. अनिरूद्ध मालपाणी यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आपल्या संस्थेप्रती गुरूदक्षिणा म्हणून मालपाणी दाम्पत्याने रुग्णालयात केंद्र उभारून दिले आहे. मालपाणी अंजली व अनिरूद्ध (MAA) मा आयव्हीएफ एक्सलेंस केंद्र हे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून अपत्यासाठी प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्याला देण्यात येणाऱे उपचार हे खासगी क्षेत्रातील उपचाराच्या तुलनेत ५० टक्के सवलतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आयव्हीएफ केंद्राच्या माध्यमातून वर्षभरात ५०० ते ६०० रुग्णांना सेवा देणे शक्य होणार आहे.

या केंद्राच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण आणि उच्च दर्जाची आयव्हीएफ उपचार पद्धती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या मध्यम तसेच अल्प उत्पन्न गटातील दाम्पत्यासाठी हे केंद्र एकप्रकारे परवडणाऱ्या दरात उपचार उपलब्ध करून देण्यासाठी मदतीचे ठरेल. तसेच, वैद्यकीय शिक्षण अंतर्गत स्त्री रोग शास्त्र विभागात प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसाठी हे केंद्र एक आदर्श केंद्र ठरणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून आयव्हीएफ उपचार पद्धती सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याबाबत तसेच परवडणाऱ्या दरांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी शोध प्रबंध प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच, हे केंद्र देशातील विविध राज्यांसाठी आयव्हीएफ उपचार योग्य पद्धतीने करण्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. तसेच शासकीय रुग्णालयांसाठी हे केंद्र आयव्हीएफ उपचार पद्धती अंगीकारण्याससाठी मार्गदर्शक ठरेल.

केईएम रुग्णालयाच्या माध्यमातून दैनंदिन स्वरूपात विविध स्वरूपाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. आयव्हीएफ उपचाराच्या माध्यमातून रुग्णाच्या सुविधांमध्ये सर्वसमावेशक सेवा पुरविणारी संस्था म्हणून मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

या वेळी बोलताना अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले की, आयव्हीएफ सेंटरची स्थापना ही व्यापक आरोग्य सेवेच्या वचनबद्धतेतील आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. वंध्यत्व ही केवळ वैद्यकीय समस्या नसून ती भावनिक आणि सामाजिक आव्हान देखील आहे, ज्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. “उच्च खर्चामुळे वंध्यत्व उपचार अनेकांना परवडत नव्हते. पालकत्वाचे स्वप्न सर्वांसाठी खुले असावे, ही आमची भूमिका आहे.” असे त्यांनी नमूद केले.

डॉ. अंजली मालपाणी यांनी सांगितले की “१९८६ मध्ये केईएममध्ये निवासी डॉक्टर म्हणून काम करत असताना वंध्यत्वामुळे निराश झालेल्या जोडप्यांचे चेहरे पाहिले. त्यावेळी स्वतःशीच ठरवले होते की सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान शिकून भारतात परत येऊन सर्वांसाठी उपलब्ध करून देईन. ४० वर्षांपूर्वी मनात रुजलेले स्वप्न आज साकार झाले आहे. आपल्या मातृसंस्थेला काहीतरी परत देण्याची ही संधी माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असेही त्या म्हणाल्या. जगभरातील दाम्पत्यांना सेवा देताना १७ हजार बालकांची आई होण्याचा अभिमान वाटतो, असेही त्यांनी सांगितले.

केईएम रुग्णालय स्थित मा आयव्हीएफ एक्सलेंस केंद्र येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रयोगशाळा, शस्त्रक्रिया कक्ष,अतिदक्षता विभाग यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच रुग्णांच्या सोयीसाठी बाह्यरुग्ण विभाग, सोनोग्राफी कक्ष, प्रसाधनगृह यासारख्या सेवाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here