Home पुणे *दिवंगत अजितदादा पवारांच्या स्मृतींना पुण्यात मानवंदना*

*दिवंगत अजितदादा पवारांच्या स्मृतींना पुण्यात मानवंदना*

57
0

*बालगंधर्व रंगमंदिरात शोकसभेचे आयोजन; पुणे शहरातील मान्यवरांची उपस्थिती*

*नेतृत्वाचा अस्त… अजित पवारांच्या निधनानंतर पुणे शोकमग्न*

*काम, कर्तव्य आणि माणुसकी… अजितदादांच्या आठवणींनी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे भावूक*

पुणे, ४ फेब्रुवारी :

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात शोकसभेचे आयोजन करण्यात आले. राज्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
या शोकसभेला महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय विविध पक्षांचे नेते, प्रशासकीय अधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बालगंधर्व रंगमंदिर परिसर शोकमय वातावरणाने भारलेला होता.

शोकसभेच्या प्रारंभी अजित दादा पवार यांच्या राजकीय प्रवासाचा, प्रशासनातील योगदानाचा आणि जनतेशी असलेल्या नात्याचा आढावा घेण्यात आला. उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तर मनात आठवणी दाटून आल्या.

*काम, कर्तव्य आणि माणुसकी… आठवणींनी नीलम गोऱ्हे भावूक*

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, अजितदादांना मी अगदी जवळून पाहिले. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि त्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

अधिवेशन काळातील आठवणी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील प्रसंग, तसेच जलसंधारण क्षेत्रातील कामकाजाचा त्यांनी उल्लेख केला. त्या काळात विधानपरिषदेची आमदार होते. अजितदादांकडे एकही काम प्रलंबित राहिले नाही, असा अनुभव असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

२०१९ मध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर कोविड काळात कोट्यवधी रुपयांची बिले कमी करण्याचा कठोर निर्णय त्यांनी घेतला, हेही त्यांनी आवर्जून नमूद केले. अधिवेशनातील अनुभव सांगताना उपसभापती म्हणून त्यांची कार्यशैली वेगळी आणि परिणामकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लाडकी बहीणसह विविध विकास योजनांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची त्यांची भूमिका कायम राहिली, असे सांगत नीलम गोऱ्हे यांनी अजित पवारांच्या कार्याला आदरांजली वाहिली.

दरम्यान, सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्पष्टवक्ता, निर्णयक्षम आणि अष्टपैलू असलेले अजित पवार यांच्यासारखे नेतृत्व घडण्यासाठी वर्षानुवर्षांची प्रक्रिया लागते, अशा शब्दांत उपस्थितांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here