_*भारतीय कथांच्या जागतिक प्रसारासाठी सिखिया एंटरटेनमेंटमधील ५०.१% हिस्सेदारीचे संपादन.*
*मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड (RSBVL) ने आज सिखिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड (SEPL) या भारतातील प्रख्यात प्रॉडक्शन हाऊसमध्ये *५०.१%* हिस्सेदारी संपादन केल्याची घोषणा केली. प्राथमिक आणि दुय्यम व्यवहारांच्या (Primary and Secondary transactions) माध्यमातून *१५०* कोटी रुपयांच्या एकूण रोख प्रतिफलात हा व्यवहार संपन्न झाला आहे. या संपादनाद्वारे रिलायन्सची मीडिया आणि कंटेंट शाखा ‘जिओ स्टुडिओज’, मनोरंजन क्षेत्रातील आपले नेतृत्व अधिक दृढ करणार आहे.
जिओ स्टुडिओजने भारतीय मनोरंजन क्षेत्रात मोलाची भूमिका बजावली असून, जागतिक प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरणाऱ्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘धुरंधर’ (भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट), ‘लापता लेडीज’ आणि ‘स्त्री’ फ्रँचायझी यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांच्या यशातून जिओ स्टुडिओजने आपली क्षमता सिद्ध केली आहे.
जिओ स्टुडिओज आणि SEPL मधील हे सहकार्य भारत आणि जागतिक बाजारपेठेसाठी चित्रपट आणि मालिकांच्या सह-निर्मितीवर लक्ष केंद्रित करेल. हे धोरणात्मक युती जिओ स्टुडिओजची व्यापक पोहोच आणि शाश्वत बौद्धिक संपदा (Intellectual Property) निर्माण करण्याचे व्हिजन, सिखिया एंटरटेनमेंटच्या जागतिक स्तरावर प्रशंसित आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या कथा सांगण्याच्या कौशल्याशी जोडते.
गुनीत मोंगा कपूर आणि अचिन जैन यांनी स्थापित केलेल्या सिखिया एंटरटेनमेंटने गेल्या दशकात भारतीय सिनेमाची जागतिक प्रतिमा उंचावली आहे. एकाच वेळी एकेडमी अवॉर्ड® (ऑस्कर) आणि अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवणारी ही भारतातील एकमेव संस्था आहे. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ आणि ‘पीरियड. एंड ऑफ सेंटेंस’ या ऑस्कर विजेत्या माहितीपटांसह ‘मसान’, ‘सोरारई पोट्रू’ आणि ‘कटहल’ यांसारख्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांनी सिख्याला जागतिक स्तरावर एक प्रतिष्ठित ब्रँड म्हणून स्थापित केले आहे.
या भागीदारीवर मत मांडताना, *ज्योती देशपांडे, प्रेसिडेंट – जिओ स्टुडिओज (मीडिया अँड कंटेंट बिझनेस, RIL)* म्हणाल्या: “सिखिया एंटरटेनमेंटने सातत्याने अशा आशयाची निर्मिती केली आहे जो मूळचा भारतीय असूनही जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवतो. हा करार सर्जनशील उत्कृष्टता आणि सांस्कृतिक अस्सलतेवर विश्वास ठेवणाऱ्या निर्मात्यांसोबत भागीदारी करण्याच्या आमच्या धोरणाशी सुसंगत आहे. सिख्याचा वारसा आणि जिओ स्टुडिओजची वितरण क्षमता यांच्या एकत्रिकरणातून आम्ही भारतीय कथांना जागतिक स्तरावर एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहोत.”
*गुनीत मोंगा कपूर आणि अचिन जैन, सिखिया एंटरटेनमेंट*, यांनी नमूद केले की:”कथांमध्ये भौगोलिक आणि भाषिक सीमा ओलांडून लोकांना जोडण्याची ताकद असते. जिओ स्टुडिओजसोबतची भागीदारी आम्हाला या कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत नेण्यासाठी आणि देशातील नवीन प्रतिभेला सक्षम करण्यासाठी एक सुवर्णसंधी प्रदान करते. ज्योती देशपांडे यांची कल्पकता आणि धाडसी व्यावसायिक निर्णयांप्रती असलेली त्यांची निष्ठा यामुळे ही भागीदारी अधिक आशादायक ठरली आहे.”





















