नाशिक : महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी गुरुवारी नाशिक शहरात काही मतदान केंद्रांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसूून आले. प्रभाग क्रमांक २४ मधल्या एका मतदान केंद्रावर ईव्हीएम संदर्भात गंभीर आरोप झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली .
शिवसेने(शिंदे) च्या उमेदवारांकडून असा आक्षेप करण्यात आला की, ‘धनुष्यबाण या चिन्हासमोर बटण दाबल्यास मशीनवर भाजपच्या चिन्हासमोर लाईट लागत असल्याचे मतदारांच्या निदर्शनास आले.’
ईव्हीएमच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित
हा प्रकार प्रभाग क्रमांक २४ मधील ग्रामदेव प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर घडल्याचे समोर आले आहे. काही मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करताना संशयास्पद प्रकार घडल्याचा आरोप करत निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही दाखल केली आहे. ईव्हीएमच्या कार्यप्रणालीवरच प्रश्न उपस्थित झाल्यामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला.
दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी आणखीन गंभीर आरोप केले, “ईव्हीएमबाबत तक्रार करणाऱ्या मतदारांना धमकावले जात असल्याचे दिसत आहे.” त्यामुळे मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाले असून, निष्पक्ष चौकशीची मागणी केली जात आहे. या एकूणच प्रकारामुळे मतदान केंद्राबाहेर
काही वेळ गर्दी वाढली आणि त्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला.
तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक २४ मधील मॉडर्न हायस्कूलच्या खोली क्रमांक ८ मध्ये ठेवलेल्या ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने सकाळी मतदान सुरू होण्यास उशीर झाला. मशीन नीट सुुरु न झाल्याने काही वेळ मतदारांना मतदानासाठी थांबावे लागले. निवडणूक कर्मचाऱ्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला.
नाशिकमधील ईव्हीएम संदर्भातील तक्रारी आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रशासनाची धावपळ वाढली , निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी अतिरिक्त दक्षता घेतली गेली.या घटनांचा मतदानाच्या एकूण वातावरणावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचेच लक्ष आहे.




















