* प्रशिक्षणार्थींसाठी ६ सुत्री कार्यक्रम जाहीर
* आयटीआयमध्ये प्रशिक्षण देऊन खाजगी उद्योगातही प्राधान्य देणार*
नागपूर
कौशल्य विभागाच्या अंतर्गत राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थीना रोजगाराची मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. तसेच खाजगी उद्योगात आवश्यक असलेले कौशल्य प्रशिक्षण त्या विद्यार्थ्यांना आयटीआयच्या माध्यमाने देऊन रोजगारासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान सभेत सांगितले. तसेच प्रशिक्षणार्थींसाठी सहा सूत्री कार्यक्रम जाहीर करत असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. विधानसभा सदस्य डॉ.राहुल पाटील आणि अमित साटम यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबत सविस्तर भूमिका मांडली.
राज्य सरकारच्या वतीने ९ जुलै २०२४पासून मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत १२ वी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना प्रती महा सहा हजार रुपये, पदविका प्राप्त प्रशिक्षणार्थींना आठ हजार रुपये,तर पदवीधर प्रशिक्षणार्थींना प्रतिमाह दहा हजार रुपये विद्या वेतन दिले जाते. योजना सुरू झाल्यापासून ८१०.२७ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तर हिवाळी अधिवेशनात४०८ कोटींची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आलेले आहे असेही मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.
राज्यातील तरुणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी तसेच स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना आहे. त्यानुसार सहा सुत्री कार्यक्रमाच्या माध्यमाने उद्दिष्ट साध्य करणार असल्याचे मंत्री लोढा यांनी सभागृहात सांगितले.
१) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत (ITI) राबविण्यात येणाऱ्या अल्पकालीन अभ्यासक्रमांमध्ये १०% प्राधान्य आरक्षण ठेवण्यात येईल. लाभार्थी विद्यार्थ्यांना सदर अल्पकालीन अभ्यासक्रमांमध्ये (एकदाच, कोणत्याही एका अभ्यासक्रमासाठी) मोफत प्रवेश देण्यात येईल.
२) मुख्यमंत्री स्वरोजगार योजनेच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये लाभार्थ्यांसाठी १०% प्राधान्य आरक्षण ठेवण्यात येईल.
३) मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेत प्रशिक्षित झालेल्या युवांची अद्ययावत यादी, रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उद्योग विभागास नियमितपणे उपलब्ध करून देण्यात येईल. या संबंधित महामंडळांना रोजगार/स्वयंरोजगाराकरिता लाभार्थ्यांची यादी उपलब्ध करून देण्यात येईल.
४) योजनेतील लाभार्थी यांना MSME यांचेसाठी महास्वयं पोर्टल मध्ये सुविधा कार्यान्वित करून संयुक्त स्वरूपाचा ‘Match Making Portal’ अप्लिकेशन द्वारे देखील उपलब्ध करून देण्यात येईल, ज्याद्वारे उद्योग, उद्योजक व लाभार्थी यांच्यात थेट संपर्क व रोजगार-संधी निर्माण होतील.
५) विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यांमध्ये या योजनेतील लाभार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था (विशेष कक्ष) तसेच प्राधान्य देण्यात येईल.
६) खाजगी कंपन्यांना आवश्यक असलेल्या तात्पुरत्या मनुष्यबळासाठी आयटीआय मार्फत आवश्यकतेनुसार विशेष प्रशिक्षण देऊन, अशा रोजगारामध्ये मुख्यमंत्री युवा करू प्रशिक्षण योजनेतील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सद्य स्थितीत १ लाख १६ हजार ३८४ प्रशिक्षणार्थी आहेत. तर १लाख दहा हजार ११२युवांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. येत्या १ जानेवारीपासून प्रशिक्षणाची दुसरी बॅच सुरू होणार असल्याची माहितीही मंत्री लोढा यांनी यावेळी दिली.


















