*• माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांचीही प्रमुख उपस्थिती*
*• पश्चिम उपनगरातील साडेतीन लाख नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केंद्र सज्ज*
पश्चिम उपनगरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मालाड मालवणी स्थित नव्याने उभारण्यात आलेल्या नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण दि ६ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सुमारे साडेतीन लाख लोकसंख्येला प्राथमिक आरोग्य सेवा पुर्वीप्रमाणे पुरवण्याच्या उद्देशाने हे आरोग्य केंद्र सज्ज झाले आहे. सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या डॉक्टर, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या माध्यमातून ही सेवा पश्चिम उपनगरातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्राथमिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करतानाच गुणवत्तापुर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे. जेणेकरून रुग्णांचा वेळ वाचतानाच उपचारही नजीकच्या परिसरातच उपलब्ध होतील, यासाठी आरोग्य सेवा अद्ययावतीकरणाला प्राधान्य देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील आहे. मालाड मालवणी स्थित नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या सुविधेमुळे सुमारे साडेतीन लाख नागरिकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध होईल. तसेच आरोग्य केंद्रातून संदर्भित करण्यात येणारे रुग्ण महानगरपालिकेच्या प्रमुख तसेच उपनगरीय रुग्णालयांमध्ये संदर्भित करणे शक्य होईल. परिणामी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांवर येणारा ताण कमी करण्यासाठी मदत होईल.
तर, राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेच्या निकषांनुसार शहरी नागरी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्राथमिक वैद्यकीय सेवा पुरविणे हे वैद्यकीय महाविद्यालयांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या डॉक्टर आणि कर्मचारी, प्रशिक्षणार्थींमार्फत प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच डॉक्टर, विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थींना अनुभव उपलब्ध होण्यासाठी हे केंद्र मदतीचे ठरणार आहे.
नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी वैद्यकीय, महिला आरोग्य, त्वचाविकार, दंत, क्षयरोग यासारख्या आजारांसाठीची बाह्यरुग्ण विभागाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याठिकाणी वैद्यकीय सुविधा घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना नजीकच्या हरिलाल भगवती महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, खुरशादजी बेहरामजी भाभा महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रू. न. कूपर रुग्णालय येथे संदर्भित करण्यात येईल. सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या डॉक्टर, कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा एकूण ३५ जणांचा चमू या केंद्राच्या ठिकाणी कार्यरत असणार आहे. या कम्युनिटी मेडिसीन विभागामार्फत या चमूमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, २० निवासी वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षणार्थी आणि कर्मचारी अशा ३५ जणांचा समावेश आहे. सकाळी ९.३० ते सायंकाळी ४ दरम्यान बाह्यरुग्ण विभागामार्फतची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सकाळ तसेच दुपार सत्रातील
बाह्यरुग्ण विभाग सेवेसोबतच विशेष बाह्यरुग्ण सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
*केंद्राच्या इमारतीची वैशिष्ट्ये-*
नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विविध आजारांसाठीची बाह्यरुग्ण सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्रात येणाऱ्या रुग्णांच्या सुविधेसाठी प्रशस्त आसनव्यवस्था आणि प्रतीक्षा कक्षदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. दिवसापोटी २५० ते ३०० रुग्ण हाताळण्याची या बाह्यरुग्ण विभागाची क्षमता आहे. पाच मजली इमारतीतील तीन मजले हे कम्युनिटी मेडिसीन विभागासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येत्या कालावधीत कर्मचारी संख्या वाढवतानाच अद्ययावत अशी हॉस्पिटल मॅनजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम (HMIS) प्रणालीही अंमलात येणार आहे.
वाचनालय, माहिती शिक्षण आणि संवाद सभागृह, सार्वजनिक आरोग्य संग्रहालय, संशोधन केंद्र, लसीकरण कक्ष आदी सुविधाही याठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील.
आरोग्य दिनविशेष, रॅली आयोजित करणे, आरोग्य चिकित्सा शिबिरे आयोजित करणे, आरोग्य प्रशिक्षण सत्राचे आयोजन करणे, पथनाट्ये, स्थानिक स्वयंसेवी संस्था यांच्या समन्वयातून कार्यक्रमाचे आयोजन करणे असे उपक्रमही राबवण्याचा सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाचा मानस आहे.
***



















