Home मुंबई *केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई...

*केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई पब्लिक स्कूल मंडपेश्वर नवीन शालेय इमारतीचे हस्तांतरण*

50
0

*महानगरपालिका शाळेच्या विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन वितरण उपक्रमाचाही शुभारंभ*

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या
आर उत्तर विभागातील बोरिवली (पश्चिम) परिसरातील मंडपेश्वर महानगरपालिका शालेय इमारतीचे हस्तांतरण केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्‍या हस्ते दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले.

आमदार मनीषा चौधरी, उप आयुक्त (परिमंडळ ७) संजय कुऱ्हाडे, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, आर उत्तर विभागाचे सहायक आयुक्त नयनीश वेंगुर्लेकर, शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांच्‍यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल म्‍हणाले की, “बृहन्मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग मुंबई पब्लिक स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असतो. महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन वितरण करण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. अशा उपक्रमांतून सकारात्मक विचारांची पायाभरणी केली जाते. सध्या प्रत्येक क्षेत्रात मुलींचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. आज शिक्षण घेत असलेल्या मुली उद्याच्या देशाचे भवितव्य घडविणार आहेत. या मुली शिक्षण घेवून देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना देतील. या मुली विविध क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करतील. मुंबईतील एकही मुलगी या उपक्रमातून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी.” अशी सूचनाही ना. गोयल यांनी यावेळी केली.

आमदार मनीषा चौधरी म्हणाल्या की, “बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन वितरण करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा मुंबईतील जवळपास ६० हजार मुलींना लाभ मिळणार आहे. तसेच शाळेसाठी नवीन इमारत मिळाली, यामुळे गणपत पाटील नगरातील मुलांना मोठा फायदा होईल. येथील विद्यार्थ्यांना महानगरपालिका शाळांतून दर्जेदार शिक्षण मिळेल.” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविक उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी केले. त्या म्हणाल्या की, “शहर साधन केंद्रामार्फत महानगरपालिकेच्या इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करण्याचे नियोजन आहे. दि.१२ मार्च २०२५ रोजी केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत कांदिवली येथील महानगरपालिकेच्या शाळेत मुलींना सॅनिटरी नॅपकिन वितरण करण्यात आले होते. त्यावेळी ना. गोयल यांनी केलेल्या सूचनेनुसार आज मुंबईतील सर्व शाळांमधील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन वितरणाचा शुभारंभ करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मंडपेश्वर शाळेसाठी अत्यंत सुंदर अशी इमारत आज हस्तांतरित करण्यात आली. स्मार्ट क्लासरूमपासून सर्व सुविधा उत्तम आहेत. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे, मुंबईतील एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी आवर्जून प्रयत्न करण्यात येईल.” असेही जांभेकर यांनी नमूद केले.

महानगरपालिका मंडपेश्वर शाळेसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या नवीन इमारतीची तळमजला आणि चार मजले अशा स्वरुपात बांधणी करण्यात आली आहे. यात एकूण १५ वर्ग खोल्या आहेत. मुख्याध्यापक कार्यालय, शिक्षक खोली, ग्रंथालय, संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, ऍक्टिव्हिटी खोली, उद्यान, परस बाग इत्यादी सुविधा या इमारतीत आहेत. तसेच, एक सभागृहदेखील आहे
बोरिवली परिसरातील गणपत पाटील नगर येथील वस्तीतील आणि आय. सी. कॉलनीतील विद्यार्थ्यांना ही शाळा घरापासून कमी अंतरावर असल्याने पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here