अयोध्या,
दिवाळीनिमित्त प्रभू श्रीरामांची ‘अयोध्या नगरी ‘ २९ लाख दिव्यांनी उजळून निघाली .
या निमित्ताने केलेली ही विक्रमी आरास तसेच आणखीन एक विक्रम ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवला गेला आहे. ‘राम की पैडी’ येथील ५६ घाटांवर २६.११ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. तसेच शरयू तीरावर इतरत्रही दिव्यांची आरास करण्यात आली होती. अयोध्या नगरी एकूण २९ लाख दिव्यांनी झळाळून गेली होती.
हा ‘दीपोत्सव’ पाहण्यासाठी जगभरातून लोक अयोध्येत दाखल झाले आहेत. ड्रोनच्या सहाय्याने या दिव्यांची मोजणी केल्यानंतर ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चे स्वप्निल दंगारीकर आणि सल्लागार निश्चल बारोट यांनी या विश्वविक्रमाची घोषणा केली.
सलग नववा असा हा जागतिक विक्रम झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रभारी मंत्री सूर्य प्रताप शाही आदी मान्यवर या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार बनले. तसेच शरयू नदीवर झालेल्या आरतीत २,१०० वेदाचार्य सहभागी झाले होते. या विक्रमाचीही नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली.
‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या ७५ जणांच्या पथकाने शरयू नदी तीरावरील ५६ घाटांवरील दिव्यांची मोजणी केली. यासाठी विद्यापीठाचे पर्यवेक्षक, घाट प्रभारी, समन्वयक व स्वयंसेवक उपस्थित होते. दिवे लावण्यापुर्वी घाटावर तेल सांडू पडू नये याकडे बारकाईने लक्ष दिले गेले.
दीपोत्सवापुर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘रामकथा पार्क’च्या मंचावर श्रीराम यांची सांग्रसंगीत पूजा केली. मुख्यमंत्री योगी यांनी लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि गुरु वशिष्ठ यांचीही पूजा केली. याप्रसंगी ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने शरयू तीर दुमदुमले.




















