*कामगार नगर, दादर अग्निशमन केंद्र वसाहतीला श्री. व सौ. गगराणी यांनी दिवाळी निमित्ताने दिली भेट*
मुंबई म्हणजे वेळेशी शर्यत लावणारे महानगर. मुंबईच्या अंगात जणू धावत्या घड्याळाचा ठोकाच धडधडतो असतो. हे महानगर अहोरात्र धावत असते. अशा या न थांबणाऱ्या मुंबईला सतत तृप्त, सशक्त आणि आनंदी ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विविध सेवा देत सतत झटत असते. या सेवांमध्ये पाणीपुरवठा सेवा म्हणजे महानगराच्या धमन्यांमधून वाहणारा जीवनरसच. या जीवनरसाला अविरत वाहते ठेवणारे हात म्हणजे महानगरपालिकेचे ‘चावीवाले’ कर्मचारी. त्यांच्या अथक श्रमांमुळे मुंबईच्या प्रत्येक घरात हा जीवनरस पोहोचतो. याच चावीवाल्या कामगारांच्या कुर्ला कामगार नगर येथील वसाहतीला बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी सदिच्छा भेट देऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. आपल्या संस्थेचे प्रमुख थेट आपल्या दारी आलेले पाहून, चावीवाले, पंपचालक, कामगार, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दीपोत्सवाचे रंग उजळले.
मुंबईसारख्या महानगराला दररोज अनेक सेवांच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिका सतत जिवंत ठेवत असते. “एक कुटुंब” म्हणून सर्व अधिकारी आणि कर्मचारी एकत्रितपणे दिवाळी सण साजरा करत असल्याचे पाहून अतिशय आनंद झाला, असे श्री. गगराणी यावेळी म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, “प्रशासनात धोरणात्मक निर्णय जरी आम्ही घेत असलो तरीही, प्रत्यक्ष शेवटच्या व्यक्तीशी लोकांचा संबंध हा यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचा येतो. दिवाळी सणाच्या निमित्ताने कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळाली. यंत्रणा अहोरात्र काम करत असतानाच त्यांच्या कुटुंबियांसोबत सण साजरा करण्याची पोचपावती या भेटीच्या निमित्ताने मिळाली.”
गतवर्षापासून आयुक्त गगराणी यांनी दिवाळीनिमित्त थेट कामगारांच्या घरी जाऊन त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचे दुसरे पुष्प श्री. गगराणी यांनी आज (दिनांक १९ ऑक्टोबर २०२५) कुर्ला येथील कामगार नगर वसाहतीत गुंफले. यावेळी त्यांच्या पत्नी डॉ. शीतल गगराणी या आवर्जून उपस्थित होत्या.
श्री. व सौ. गगराणी यांनी वसाहतीत पाऊल टाकताच, वसाहतीतील कामगार आणि त्यांच्या परिवारासाठी खऱ्या अर्थाने दिवाळी सण सुरू झाला. घरोघरी सजलेले तोरण, दारात एक-एक टिपक्यांनी गुंफलेली विविधरंगी रांगोळी आणि उजळलेले चेहरे – अशा उबदार वातावरणात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गगराणी दांपत्याचे स्वागत केले.
गगराणी दांपत्याने घरोघरी जाऊन दिवाळीचा फराळ शुभेच्छा भेट म्हणून दिला. अनेकांच्या घरात वृद्ध आई-वडील होते, लहान मुलं होती; त्यांच्याशीही गगराणी दांपत्याने गप्पा केल्या, त्यांची विचारपूस केली आणि दिवाळी सणानिमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील नात्यांची वीण आणखी घट्ट केली.
ग्रामसेवक वाल्मिकी, बाबा कांबळे, बाळासाहेब गरुड, उत्तम झोरे, गौतम ससाणे या कर्मचाऱ्यांच्या घरी श्री. व सौ. गगराणी यांनी भेट दिली.
सहायक आयुक्त (एम पूर्व) शंकर भोसले, उपप्रमुख अभियंता (जल अभियंता विभाग) सुशील चव्हाण आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
*मुंबई अग्निशमन दलाच्या वसाहतीलाही सदिच्छा भेट*
वेगाशी स्पर्धा करणाऱ्या मुंबई महानगराला सतत सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या विविध प्राधिकरणांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दल आघाडीवर आहे. मुंबईवर कोणतेही संकट आले असता, मुंबई अग्निशमन दल तत्परतेने या संकटाला सामोरे जाते आणि त्यातून मुंबईकरांची सुखरूप सुटका करते. दादर येथे मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांची वसाहत आहे. या वसाहतीलाही आज श्री. आणि सौ. गगराणी यांनी दिवाळीनिमित्त भेट दिली. या ठिकाणी देखील त्यांनी सर्व जवानांच्या परिवाराला दिवाळीचा फराळ भेट दिला आणि त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा केल्या.
मंगेश शिवडीकर, शरद कुमावत, नारायण कोकितकर, राजेश सावंत आदी कर्मचारी व अधिकारी वर्गाच्या घरी जाऊन आणि सौ. गगराणी यांनी दिवाळीनिमित्त भेट दिली.
मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर, उपअग्निशमन अधिकारी अनिल परब, के. आर. राव, विभागीय अग्निशमन अधिकारी श्री. मनोज सावंत यावेळी उपस्थित होते.
—


















