*बाल-कुमारांसाठी दिवाळी अंक संच योजना आणि दिवाळीसंध्या*
वयम्, किशोर, चिकू पिकू, युवा दिवाळी, बालकुमार दिवाळी, पासवर्ड, विज्ञानधारा आणि प्रतिभांगण काहीतरी विशेष हे ८ अंक घरपोच११६० रुपयांत उपलब्ध केले. त्यानिमित्त आयोजित ‘गम्माडी गंमत… जम्माडी जंमत…!’ हा बाल-कुमार कलाकारांनी सादर केलेला नाट्य, नृत्य, गाणी आणि मस्ती… कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला.
ग्रंथाली, मराठी एकीकरण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सहकार्याने दि. १७ ऑक्टोबर रोजी बालकुमार दिवाळीसंध्याचे आयोजन मीरारोडमधील लता मंगेशकर नाट्यगृहात करण्यात आले होते.
कार्यक्रमात ८ अंक आणि ‘अधोरेखित’ या दिवाळी अंकांचे प्रकाशन चिन्मयी सुमित, राजू तुलालवार, डॉ. दीपक पवार, अपर्णा पाडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चिन्मयी सुमित म्हणाल्या, “आज या कार्यक्रमात मराठी माध्यमातील मुलांची उपस्थिती आणि सहभाग ही विशेष आनंदाची बाब आहे.” ‘वयम्’च्या संपादक शुभदा चौकर म्हणाल्या की , “वाचनसंस्कृती रुजवण्यात दिवाळी अंकांचे बहुमोल योगदान आहे आणि विद्यार्थ्यांना वाचनाकडे वळण्यासाठी प्रवृत्त करण्यात ग्रंथाली आयोजित करत असलेल्या बालकुमार दिवाळी उपक्रमाचा खूप मोठा वाटा आहे.”
प्रास्ताविक करताना ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर म्हणाले, की “उद्याचा वाचक, लेखक घडवायचा असेल तर लहान मुलांसाठीचे उपक्रम राबवणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने ग्रंथाली सातत्याने विविध उपक्रम राबवत आली आहे.
मराठी एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष अॅड. प्रदीप सामंत यांनी मनोगतात मीरारोडमध्ये पहिल्यांदाच बालकुमारांसाठी साहित्य, नाट्य, गायन यांचा समावेश असलेला दिवाळीसंध्या कार्यक्रम आयोजित होत आहे याबद्दल आनंद व्यक्त केला.
‘प्रतिभांगण काहीतरी विशेष’च्या संपादक सुधा तुंबे यांनी हा दिवाळी अंक दिव्यांग बांधवांविषयी असून समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप व्हावा या दृष्टीने अंकाची मांडणी करण्यात आली आहे असे सांगितले.
या कार्यक्रमात ग्रंथालीचे विश्वस्त राजीव श्रीखंडे, लेखिका राणी दुर्वे, सुनंदा भोसेकर, संपादक अरुण जोशी, चित्रकार पुंडलिक वझे, विजयराज बोधनकर, कवी मोहन काळे, ‘सृजन’ विरारचे संदीप फाटक, मराठी एकीकरण समितीचे रवींद्र भोसले, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार, पत्रकार अपर्णा पाडगावकर, पुंडलिक पै, शोभा हिंगलासपूरकर, सुजाता साने, धनश्री धारप, अधोरेखितच्या संपादक डॉ. पल्लवी परुळेकर-बनसोडे आणि स्वाती जोशी आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. दिवाळी अंक प्रकाशन कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन डॉ. लतिका भानुशाली यांनी केले.
बालकुमारांनी गायन, नृत्य, नाट्य आणि अभिवाचन याचा बहारदार आविष्कार करून ‘गंमाडी गंमत जम्माडी जंमत’ कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाची संकल्पना व संहिता अश्विनी भोईर यांची तर सृजन विरार संस्थेने संदीप फाटक ,श्रद्धा प्रभू यांच्या मार्गदर्शनात शबनम बोचाल, शुभ्रा डांगे, श्रेया मांडवे, अनन्या यादव, शोभ्रा इजगज, दक्षता मातेरा, रागिणी यादव, ज्ञानेश्वरी मुंडे, प्रेरणा चौधरी, स्वरा वाळुंज, मेघना खोगरे, दुर्वा पार्टे, जान्हवी दरेकर, प्रीती गजभार, यज्ञेश कुलकर्णी, विश्व गवते, आदित्य सातपुते, लावण्या इंगोले या कलाकारांनी उत्तम सादरीकरण केले.
पत्रकार अपर्णा पाडगावकर यांनी ‘हॅनाची सुटकेस’ या पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन केले. ते ऐकताना अनेकांचे डोळे पाणावले.
बालकुमार दिवाळीसंध्या कार्यक्रमाच्या आयोजनात कार्यक्रम संयोजक धनश्री धारप, व्हिडिओ एडिटर समीर कदम, चित्रकार-सजावटकार हेमंत जोशी, अनिल भोसले, सौमित्र शिंदे, प्रियाल देवलाटकर, अनिरुद्ध गद्रे, अंकुश कांबळे, किशोर कांबळे, स्वाती जोशी यांनी विशेष मेहनत घेतली. स्वाती जोशी यांनी आभार मानले आणि राज्यगीताच्या गायनाने समारोप करण्यात आला. मीरारोडमधील महानगरपालिका व मराठी माध्यमांच्या शाळांतील जवळपास ६०० मुले कार्यक्रमाला उपस्थित होती.


















