बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विलेपार्ले स्थित डॉ. रु. न. कूपर रुग्णालय येथे ‘पोट विकार’ (Gastroenterology) बाह्यरुग्ण विभाग (OPD) दि. २४ सप्टेंबर २०२५ पासून कार्यान्वित करण्यात आला आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या मार्गदर्शनाखाली, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांच्या निर्देशानुसार व संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. नीलम अंद्राडे यांच्या सूचनेनुसार कूपर रुग्णालयातील वैद्यकीय सेवांचा विस्तार करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही नवीन सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.
नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता तथा कूपर रुग्णालय पर्यवेक्षकीय समितीचे सदस्य डॉ. शैलेश मोहिते यांच्या हस्ते आज या बाह्यरुग्ण विभागाचा शुभारंभ करण्यात आला. औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख व पदव्युत्तर अधिष्ठाता डॉ. नीलम रेडकर यांनी हा विभाग सुरु होण्यासाठी पाठपुरावा केला.
हा बाह्यरुग्ण विभाग दर बुधवारी दुपारी १ ते ३ या वेळेत कार्यरत राहणार आहे. या विभागासाठी डॉ. जयंत बर्वे व डॉ. शोभना भाटिया यांची मानद अतिविशेषोपचार तज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. जयंत बर्वे हे निष्णात वैद्यकीय तज्ज्ञ असून पोट व आतड्यांचे विकारांवरील वैद्यकीय उपचार पुरवण्याचा मागील चार दशकांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. डॉ. शोभना भाटिया या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयातील माजी विभागप्रमुख असून त्या तेथून सेवानिवृत्त झाल्या आहेत. या दोन्ही तज्ज्ञांच्या अनुभवाचा फायदा कूपर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना होणार आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे व बदलत्या आहारपद्धतीमुळे यकृत, पोट व आतड्यांचे विकार वाढत चालले आहेत. एन्डोस्कोपीच्या माध्यमातून या विकारांचे निदान करणे अधिक सुलभ होणार आहे. या सेवेमुळे गरजू रुग्णांना निश्चितच लाभ होणार आहे.
तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अद्ययावत कौशल्य संपादीत करण्याचा फायदा होईल. पुर्व व पश्चिम उपनगरातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये अशी सेवा देणारे हे पहिले रुग्णालय ठरले आहे.
***


















