Home Uncategorized *आदर्श शिक्षकांनी राबविलेले विविधांगी उपक्रम शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी* -डॉ. अमित सैनी

*आदर्श शिक्षकांनी राबविलेले विविधांगी उपक्रम शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी* -डॉ. अमित सैनी

66
0

*ज्ञानार्जनासह विविध शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ने सन्मान*

“शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक सतत क्रियाशील असतात. विविध शैक्षणिक उपक्रम राबवितात. त्यामुळे विद्यार्थी गुणवंत होतात, त्यांचा शैक्षणिक आलेख उंचावतो. हे कौतुकास्पद आहेच, मात्र यासोबतच आपल्या वर्गातील शैक्षणिक दृष्टीने मागे पडणाऱया विद्यार्थ्यांना शोधावे आणि त्यांना अभ्यासात पुढे आणण्यासाठी प्रयत्न करावेत.” असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पुर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी केले.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली निर्धारित निकषांनुसार महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) समितीद्वारे आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली होती. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात आज (दिनांक १७ सप्टेंबर २०२५) या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी डॉ. सैनी बोलत होते.

उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी, शिक्षणाधिकारी सुजाता खरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

डॉ. सैनी म्हणाले, “बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांतील शिक्षक उपक्रमशील आहेत. यावर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इयत्ता दहावीचा निकाल ९३ % इतका लागला. यापुढे १०० टक्के निकाल कसा लागेल, लागण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत. आदर्श शिक्षक , महापौर शिक्षक आपल्या शाळेत राबवित असलेले उपक्रम वाखाणण्याजोगे आहेत. हे उपक्रम महानगरपालिकेच्या इतर शाळेत राबविण्यात यावेत, काही निवडक आणि चांगल्या उपक्रमांची निवड करून त्यावर आधारित एक उत्तम शैक्षणिक विशेषांक तयार करू.”असे मत डॉ. सैनी यांनी व्यक्त केले. डॉ. सैनी यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना देखील उजाळा दिला.

उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर म्हणाल्या, “आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी मुलाखती घेताना शिक्षक राबवित असलेले उपक्रम खूप कौतुकास्पद असल्याचे जाणवले. शाळा आणि विद्यार्थी यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महानगरपालिका शाळेतील शिक्षक खूप परिश्रम घेतात. इतर शिक्षकांनी देखील यातून प्रेरणा घ्यावी. डॉ. जांभेकर यांनी गणित गुरुवार उपक्रम, त्याचे फायदे यावरही मनोगतातून प्रकाश टाकला.

शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांनी प्रास्ताविकातून ,आदर्श शिक्षक पुरस्कारामागची संकल्पना मांडली. पुरस्कार प्राप्त शिक्षकांपैकी वृषाली देसाई, रजनी आव्हाड यांनी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त केले.

दि ५ सप्टेंबर २०२५ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ जाहीर करण्यात आले होते. या पुरस्कारप्राप्त शिक्षकांना आज प्रत्येकी रुपये ११ हजार (ECS द्वारे), बृहन्मुंबई महानगरपालिका मानचिन्हाचे पदक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व फेटा प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
*५० उपक्रमशील शिक्षकांचा गौरव*

सन २०२४-२५ च्या पुरस्कारासाठी आदर्श शिक्षकांची निवड करण्यासाठी महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व विनाअनुदानित शाळांतील एकूण १४२ शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून ५० आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली. पुरस्कारार्थींमध्ये २७ महिला शिक्षकांसह २३ पुरुष शिक्षकांचा समावेश आहे. तसेच पुरस्कारार्थींमध्ये मराठी माध्यमाचे १०, इंग्रजी माध्यमाचे ०५, हिंदी ०६, उर्दू ६, गुजराथी भाषा एक, विशेष मुलांची शाळेतील एक शिक्षक, मान्यताप्राप्त खासगी अनुदानित व विनाअनुदानित १२ यासह तमीळ, तेलगू आणि कन्नड माध्यमाच्या शाळा मिळून एक, शारीरिक शिक्षण, चित्रकला, हस्तकला/कार्यानुभव आणि संगीत या माध्यमाच्या शाळांमधून प्रत्येकी एक आणि माध्यमिक शाळांमधून ४ असे एकूण ५० शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here