Home मुंबई *बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबई महानगरात भटक्या श्वानांसाठी रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम*

*बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबई महानगरात भटक्या श्वानांसाठी रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम*

102
0

*• दि १ सप्टेंबर २०२५ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत विविध प्राणी कल्याण संस्थांच्या साहाय्याने भटक्या श्वानांचे लसीकरण*

*• लसीकरणासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे महानगरपालिकेकडून आवाहन*

श्वानांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बचावाच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘रेबिजमुक्त मुंबई’साठी पुढाकार घेण्यात आला आहे. या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि विविध प्राणी कल्याण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर व उपनगरे) भटक्या श्वानांसाठी दि. १ सप्टेंबर २०२५ ते दि. १५ मार्च २०२६ दरम्यान ‘सामुहिक रेबीज लसीकरण मोहीम’ राबविण्यात येत आहे. मुंबईकर नागरिकांनी या लसीकरण मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

प्राणी कल्याण करणे व प्राण्यांपासून होणारे संक्रमण टाळण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उप आयुक्त (विशेष) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून ही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.

पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘युथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ अॅनिमल्स’, ‘उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन’ तसेच ‘युनिव्हर्सल अॅनिमल वेल्फेअर सोसायटी’ या प्राणी कल्याण संस्थांसोबत मिळून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दि. १ सप्टेंबर २०२५ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत भटक्या श्वानांच्या लसीकरणासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. भटक्या श्वानांचे व्यापक प्रमाणात लसीकरण करून रेबीजपासून होणाऱ्या मानवी मृत्यूचे प्रमाण कमी करणे, प्राणी कल्याण करणे आणि समुदायाची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही या मोहिमेची उद्दिष्ट्ये आहेत.

स्थानिक रहिवासी, कल्याणकारी संस्था, गृहनिर्माण संस्था, प्राण्यांना खाऊ घालणारे व प्राणी सेवक यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. तसेच, लसीकरणासाठी येणारे कर्मचारी आणि स्वयंसेवकांना परिसरात प्रवेश देणे व भटक्या श्वानांची ओळख पटवून देणे इत्यादी कार्यवाहीमध्ये सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here