*महिला बिडी कामगारांना कमी मजुरी…*
*कामगार मंत्र्यांकडून दुर्लक्ष!*
*बिडी कामगारांच्या किमान वेतना संबंधी, अप्पर कामगार आयुक्तांना निवेदन….* **
सोलापूर सह राज्यातील बिडी वळणाऱ्या महिला बिडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यासाठी कारखानदार तयार नाहीत.सरकार काही करत नाही अशी परिस्थिती सध्या सरकारची विडी कामगारांना न्याय मिळवून देण्याबाबत उदासीनता दिसून येते. शेवटचा पर्याय म्हणून अप्पर कामगार आयुक्त, पुणे यांना, महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने बिडी मालक व कामगार संघटना प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्याचे निवेदन मेल व स्पीड पोस्ट द्वारे पाठविण्यात आल्याची माहिती, महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी दिली आहे.
सदर निवेदनात सध्या सरकारी किमान वेतन अंदाजे ३४० रुपयाप्रमाणे आहे. परंतु कारखानदार हे कामगारांना २०० रुपये प्रमाणे मजुरी १००० विड्यांना देतात. म्हणजेच किमान वेतनाची अंमलबजावणी केली जात नाही. अशा प्रकारे गेल्या वीस वर्षापासून सुरू आहे. वेळोवेळी आमची संघटना व इतर कामगार संघटनांनी बिडी उद्योग टिकला पाहिजे असा विचार करून किमान वेतनाबाबत तडजोडीचा करार केल्याप्रमाणेच मूळ मजुरी दिली जाते आणि त्यात महागाई भत्ता म्हणून वाढीचा करार केलेल्या मजुरीच्या अनुषंगाने (कॅल्क्युलेशन) गणना करून दिली जाते.
किमान वेतनाचा करार सन २०१८ साली झालेला आहे. त्याची मुदत सन २०२१ ला संपली . त्यानंतर चार वर्षे झाले तरीही विडी कारखानदार त्याच कराराच्या आधारे कामगारांना मजुरी देतात. याबाबत आमच्या संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर, अप्पर कामगार आयुक्त पुणे, कामगार आयुक्त मुंबई व कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, यांना अनेक वेळा निवेदने देण्यात आली. परंतु अद्याप पर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. कारखानदार मात्र किमान वेतनाची अंमलबजावणी न करता किमान वेतन कायद्याचा भंग करून, गरीब महिला बिडी कामगारांकडून कमी मजुरी ने काम करून घेत आहेत. त्यामुळे विडी कामगारांचे किमान वेतन प्रश्न प्रलंबित राहिले आहे., म्हणून दि. ५ जुलै रोजी तुळजापूर दौरावेळी समक्ष भेटून महिला विडी कामगारांना किमान वेतनाचे अंमलबजावणी करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
तरी माननीयांनी वरील विषयी आमच्या संघटनेसह इतर कामगार संघटना, प्रतिनिधी, मालक संघ, प्रतिनिधींची बैठक आपल्या अध्यक्षतेखाली आयोजित करून महिला विडी कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी नम्र विनंती सदर निवेदनात करण्यात आली आहे.
**************************



















