Home मुंबई *श्रीगणेशमूर्ती विसर्जनस्‍थळांची अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी केली...

*श्रीगणेशमूर्ती विसर्जनस्‍थळांची अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी केली पाहणी*

78
0

मुंबईत श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे. या अनुषंगाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पुर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी दि २६ ऑगस्ट ला दिवसभर मुंबईतील प्रमुख श्रीगणेश मुर्ती विसर्जनस्थळांची पाहणी करून उपलब्ध सोयीसुविधांचा आढावा घेतला. विसर्जनाच्या दिवशी भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी चौपाट्यांवर व इतर विसर्जनस्थळांवर आवश्यक सोयीसुविधा, स्वच्छता तसेच पुरेशी सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश डॉ. सैनी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

उप आयुक्‍त (परिमंडळ ४) डॉ. भाग्‍यश्री कापसे, उप आयुक्‍त (परिमंडळ १) चंदा जाधव, उप आयुक्‍त (परिमंडळ २) तथा सार्वजनिक श्रीगणेशोत्‍सव समन्‍वयक प्रशांत सपकाळे, उप आयुक्‍त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे यांच्‍यासह डी विभागाचे सहायक आयुक्‍त मनीष वळंजू, जी उत्‍तर विभागाचे सहायक आयुक्‍त विनायक विसपुते, के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्‍त चक्रपाणी अल्‍ले, एस विभागाच्‍या सहायक आयुक्‍त अलका ससाणे, के पूर्व विभागाचे सहायक आयुक्‍त नितीन शुक्‍ल यांच्‍यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या पाहणी दौऱ्याला स्‍वराज्‍यभूमी (गिरगाव चौपाटी) येथून सुरुवात झाली. दादर चौपाटी, माहीम रेती बंदर चौपाटी, जुहू चौपाटी, जोगेश्‍वरी येथील लोकमान्‍य टिळक गणेश विसर्जन तलाव, पवई तलाव इत्‍यादी प्रमुख ठिकाणांना भेट देत सैनी यांनी पाहणी केली.

श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी चौपाट्यांवर अतिरिक्‍त मनुष्‍यबळ नियुक्त करावे. आरोग्य विभाग व सुरक्षा रक्षकांची पथके कार्यरत ठेवावीत. आवश्यक तेथे सीसीटीव्हीसह प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी आदी व्यवस्था करण्यात यावी. विसर्जनस्‍थळांवर गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्‍यात. महानगरपालिका स्‍वागत कक्षात विसर्जनासंबंधीत उद्घोषणा कराव्‍यात. निर्माल्य कलशांची व्यवस्था करावी. कृत्रिम तलाव स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. दिशादर्शक फलक लावावेत. जीवरक्षक, अग्निशमन विभागाचे जवान व आपदा मित्र यांची नियुक्ती करावी. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित ठेवावी. विसर्जनस्‍थळी विसर्जित केल्या जाणाऱ्या श्रीगणेश मूर्तींची नोंद ठेवावी. मूर्ती प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसची (पीओपी) आहे की शाडू मातीची आहे, मूर्तीची उंची सहा फूट किंवा त्यापेक्षा जास्त आहे का, याप्रमाणे नोंद करून ठेवावी. विसर्जनानतर मूर्ती संकलन, वाहतूक व पुनर्वापर यंत्रणेचे नियोजनही आवश्यक आहे. यासंदर्भात सर्व विभागीय सहाय्यक आयुक्तांनी योग्‍य देखरेख करावी, सर्वांनी सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश डॉ. सैनी यांनी संबंधित सहायक आयुक्‍त व अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here