Home Uncategorized *सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांना आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण*

*सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांना आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण*

93
0

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांनी श्रीगणेशोत्सव साजरा करताना कोणती काळजी घ्यावी, आपत्ती उद्भवू नये यासाठी कशी खबरदारी घ्यावी, आपत्ती उद्भवलीच तर नेमके व्यवस्थापन कसे करावे, याबाबत महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळातील स्वयंसेवकांना आज एफ दक्षिण विभाग कार्यालयात आज (दिनांक २२ जुलै २०२५) एकदिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.

या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत गर्दी नियंत्रण, आगीच्या घटना, आपत्ती समयी करावयाचे प्रथमोपचार, वीज सुरक्षेच्या उपाययोजना, सी. पी. आर., रुग्ण वहन, आपत्कालीन व्यवस्थापन इत्यादी महत्त्वाच्या बाबींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

अचानक आग लागल्यास आग कशी विझवावी, सी. पी. आर. कसा द्यावा, जखमी रुग्णांना रुग्णालयात कसे न्यावे, याबाबत तज्ज्ञांनी प्रात्यक्षिके सादर केली. तसेच उपस्थित स्वयंसेवकांकडून ती करून घेतली.

महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे उप प्रमुख अधिकारी (प्रशिक्षण) (प्रभारी) राजेंद्र लोखंडे, अग्निशमन अधिकारी अजित कुंभारे, ‘बेस्ट’चे दुय्यम अभियंता हरेश मोरडेश्वर, के. ई. एम. रुग्णालयातील डॉ. स्वप्नील चिटणवीस, डॉ. रेश्मा भोईर, डॉ. नेहा पवार, आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील श्री. महेंद्र खंबाळेकर यांनी यावेळी स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले.

या कार्यशाळेत एफ दक्षिण विभागातील ३९ सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळातील सहभागी स्वयंसेवकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here