Home Uncategorized *”हुंडाबळीच्या पुण्यातील वाढत्या घटना चिंताजनक ,हडपसर मधील देवकी पुजारी मृत्यू प्रकरणातील आरोपींना...

*”हुंडाबळीच्या पुण्यातील वाढत्या घटना चिंताजनक ,हडपसर मधील देवकी पुजारी मृत्यू प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा”*

72
0

*उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी*

पुणे, दि. २३ मे २०२५ : हडपसर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांतर्गत दीपा उर्फ देवकी प्रसाद पुजारी या महिलेचा झालेला मृत्यू अत्यंत गंभीर आणि चिंतेचा विषय ठरत आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल असून घटनेस एक महिना होऊनदेखील अद्याप आरोपी गजाआड झालेले नाहीत. या संदर्भात विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यांनी चिंता व्यक्त केली व पुणे शहराचे पोलीस आयुक्त यांना ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले आहे की, हुंड्यासाठी संबंधित महिलेला जीव गमवावा लागला असून एक महिना उलटूनही गुन्हा उशिराने दाखल होणे हे अत्यंत खेदजनक आहे. वैष्णवी हगवणे या तरुणीच्या हुंडाबळी प्रकरणानंतर अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने तत्काळ लक्ष घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनामध्ये निर्देशित केले आहे की , सर्व आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच या प्रकरणाचा तपास कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक दबावाविना पारदर्शक व निष्पक्षपणे व्हावा, यासाठी कार्यक्षम सरकारी वकिलांची आणि निष्पक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. गुन्ह्याची सखोल चौकशी करून जलदगतीने खटला चालवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम राबवण्यात यावेत, पोलीस ठाण्यांमध्ये पूर्वी सुरू असलेल्या महिला दक्षता समित्या व भरोसा सेल यांचा नियमित आढावा घेत त्यांच्या कामकाजावर आधारित ‘अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट’ दर आठवड्याला डीसीपी व डिवायएसपी यांनी सादर करावा त्याचबरोबर पोलीस आयुक्तांनी यावर दर महिन्याला लेखी अहवाल सादर करावा अशा उपाययोजनांची सूचना यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

तसेच, महिलांमध्ये अनिष्ट रूढी, त्याविरुद्धचे कायदे, मदतीचे पर्याय आणि शासकीय योजना याबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी शिक्षण, पोलीस आणि महिला व बालकल्याण विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सुचवले आहे.

पुण्यासारख्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानीत अशा घटनांची पुनरावृत्ती ही नक्कीच चिंतेची बाब असून पोलिस प्रशासनाने ठोस पाऊले उचलावीत असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here