Home Uncategorized *कुंभमेळ्यात महिला, बालक आणि दिव्यांगांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र व्यवस्था होणार – उपसभापती डॉ....

*कुंभमेळ्यात महिला, बालक आणि दिव्यांगांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र व्यवस्था होणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*

60
0

*प्रयागराजचा अनुभव आधार ठरवत महाराष्ट्रात कुंभमेळ्याची तयारी भक्कम*

*आपत्ती व्यवस्थापन, सीसीटीव्ही, हरवलेल्यांसाठी सहाय्यक केंद्रांची मागणी*

नाशिक, दि. २३ मे २०२५ : कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर महिला व बालकांसाठी सुरक्षित स्वच्छतागृहे ,चेंजिंग रूम,निवास व्यवस्था तसेच आपत्कालीन व्यवस्थापन आणि सांस्कृतिक उपक्रम या विषयांवर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज नाशिक विभागीय आयुक्तालय येथे महत्त्वपूर्ण शासकीय बैठक पार पडली. प्रयागराज येथे आलेल्या अनुभवाचा आधार घेत, “महिला, बालक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र व सुरक्षित व्यवस्था असणे ही काळाची गरज आहे,” असे महत्त्वाचे विधान डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केले.

त्यांनी नमूद केले की यात्रे दरम्यान फक्त नाशिक नव्हे तर शिर्डी, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, शनी शिंगणापूर, सप्तशृंगी गड इत्यादी धार्मिक स्थळांवरही सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येईल. यात्रेतील सांस्कृतिक आणि कलात्मक कार्यक्रमांमुळे श्रद्धा व संस्कृतीचा संगम साधला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर त्याचबरोबर शहर पोलीस दलातील अधिकारी, सिव्हिल सर्जन, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी आदी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे यांनी सांस्कृतिक संस्थांच्या सहभागाचा प्रस्ताव मांडला असून, यात्रेकरूंसाठी माहिती पुस्तिका, धार्मिक स्थळांची नोंदणी व मार्गदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी सीसीटीव्ही, स्पीकर, तात्पुरती आरोग्य केंद्रे व हरवलेल्यांसाठी सहाय्यक केंद्रे उभारण्याच्या सूचना दिल्या. बैठकीदरम्यान सहा वेगवेगळी सादरीकरणे सादर करण्यात आली असून, त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. “प्रयागराजप्रमाणे महाराष्ट्राचे नावही कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनात उजळून निघावे, ही आमची अपेक्षा आहे,” असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बैठकीत सांगितले

या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या पूर्वीच्या चर्चेचा उल्लेख करत डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, प्रयागराज येथे आग लागणे, हरवलेली मुले व वृद्ध, तसेच दिव्यांग यात्रेकरूंच्या अडचणी यासारख्या घटना समोर आल्या होत्या. त्या अनुभवावरून नाशिक कुंभमेळ्यात अशा अडचणींचे पूर्वानुमान घेऊन, त्या टाळण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

तसेच, कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या नागरिकांना केवळ धार्मिक पूजन व स्नानाचीच नव्हे, तर मानसिक समाधान व सांस्कृतिक अनुभवही मिळावा यासाठी, नाशिकमधील विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांच्या सहभागातून प्रवचन, कीर्तन, संगीत, नाटक इत्यादी कार्यक्रम नियोजित करण्यात येतील. यामुळे स्थानिक कलाकारांनाही व्यासपीठ मिळेल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here