Pre- School Registration Portal (ECCE) *
वयाची ६ वर्षे पूर्ण झालेल्या बालकांनाच आतापर्यंत शिक्षणाच्या प्रवाहात स्थान मिळत होते. तथापि
काळानुरूप या संकल्पनेत बदल झाला असून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणजेच ३
ते ६ या वयोगटातील बालकांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल केंद्र सरकारने उचलले
आहे. राज्यात टप्प्याटप्प्याने हे धोरण राबविण्याची प्रक्रिया शासनाने सुरू केली आहे.
सध्या महिला व बाल विकास विभागाकडून चालविल्या जाणाऱ्या अंगणवाडी, बालवाडी याबाबतची
माहिती शासनाकडे उपलब्ध आहे. तथापि, पूर्व प्राथमिकचे शिक्षण देणाऱ्या खाजगी शाळा, संस्था यावर फारसे
नियंत्रण नाही. अशा शाळांची आणि शिक्षण व्यवस्थेची माहिती उपलब्ध असण्याच्या दृष्टीने आता शिक्षण
विभागाच्या संकेतस्थळावर खाजगीरित्या चालविल्या जाणाऱ्या पूर्व प्राथमिक वर्गाच्या माहितीची नोंद करण्याची
सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे.
यासाठी खाजगी पूर्व प्राथमिक वर्गाचे शिक्षण देणाऱ्या सर्व केंद्रांची माहिती एकत्रित स्वरुपात
राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर तसेच पालकांनाही उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी वयोगट ३ ते ६ साठी
शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांची नोंदणी करण्यासाठी Pre-School Registration पोर्टल सुरू करण्यात येत आहे.
यामध्ये पूर्व प्राथमिक वर्गाचे नाव, संपूर्ण पत्ता, व्यवस्थापनाची सविस्तर माहिती, पूर्व प्राथमिक वर्गातील/
बालवाटिकामधील मुले व मुलींची संख्या, पूर्व प्राथमिक वर्गातील भौतिक सुविधा, पूर्व प्राथमिक वर्गासाठी
अध्यापन करणारे व मदतनीस अशा कर्मचा-यांची माहिती इ. प्रकारची माहिती यामध्ये उपलब्ध होणार आहे.
पोर्टलची उपयुक्तता :
१. सर्व खाजगी पूर्व प्राथमिक वर्गाची एकाच ठिकाणी नोंद उपलब्ध होणार आहे.
२. पूर्व प्राथमिकसाठीचे धोरण ठरविण्यासाठी या माहितीचा उपयोग होणार आहे.
३. नागरिकांना त्यांच्या परिसरातील पूर्व प्राथमिक वर्गाची माहिती उपलब्ध होऊ शकेल.
४. शासनास पूर्व प्राथमिकसाठी काम करणा-या कर्मचा-यांच्या क्षमता उंचावण्यासाठी मदत होईल.
५. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार वयोगट ३ ते ६ मधील बालकांसाठीच्या धोरणांची अंमलबजावणी
करणेसाठी मदत होईल.
या नोंदणीची सुविधा education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Web Links मध्ये उपलब्ध
असलेल्या Pre- School Registration Portal (ECCE ) या टॅबवर उपलब्ध करुन दिलेली आहे.
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचेकडून दिनांक २२.०४.२०२५ रोजी सदर पोर्टलचे लोकार्पण
मा. उपमुख्यमंत्री, मा.मंत्री, शालेय शिक्षण, मा. राज्यमंत्री, शालेय शिक्षण यांचे उपस्थित झाले आहे. सर्व खाजगी पूर्व
प्राथमिक व्यवस्थापनास सदर पोर्टलवर माहिती भरण्यासाठी शासनाकडून आवाहन करण्यात येत आहे

















