बावधन, पुणे – सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या पुणे वेस्ट आणि सेंट्रल रिजनतर्फे आयोजित उद्योग दिंडी उपक्रमाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा आणि उद्योग मंत्री मा. ना. उदयजी सामंत यांनी उपस्थिती दर्शवली.
यावेळी बोलताना मा. ना. उदयजी सामंत म्हणाले, “पुण्यात दोन महत्वपूर्ण दिंडीचे आयोजन झाले. कालची दिंडी विश्व मराठी संमेलनाच्या शोभायात्रेचा भाग होती, तर आजच्या उद्योग दिंडीमुळे मराठी उद्योजकांना मोठी प्रेरणा मिळणार आहे. मराठी भाषा आणि उद्योग विभाग एकत्र आल्यास मराठी उद्योजकांना भक्कम ताकद मिळेल.”
उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार महत्त्वपूर्ण पावले उचलत असून, मराठी उद्योजक तयार करण्यासाठी ‘NRM पॉलिसी’ लवकरच आणली जाईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. तसेच, उद्योग विभागाने स्थानिक उद्योजकांना रेड कार्पेट दिल्यामुळे महाराष्ट्रात ९६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी दिवेकर सर, संतोष पाटील, सुहास फडणीस, केदार साखरे यांसह अनेक उद्योजक बंधू आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्योग दिंडीच्या निमित्ताने मराठी उद्योजक एकत्र येऊन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य करण्याचा संकल्प त्यांनी केला.
















