बालरंगभूमी परिषदेच्या पुढाकाराने बीड येथे राज्यातील पहिला बाल दिव्यांग महोत्सव: उपाध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर यांची माहिती
येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था बालरंगभूमी परिषद प्रत्येक जिल्हास्तरावर दिव्यांग महोत्सव घेणार आहे. रविवार (५ऑक्टोबर) बीड दिव्यांग महोत्सवापासून याची सुरूवात होणार आहे. अशी माहिती बीड शाखेच्या अध्यक्ष तथा बालरंगभूमी परिषदेच्या उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर यांनी दिली
बालरंगभूमी परिषद आपल्या व्याप्तीनुसार मुलांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने कार्य करत असताना विशेष मुलांना सुध्दा व्यासपीठ उपलब्ध व्हावे. त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव, प्रोत्साहन देवून त्यांना सक्षम मुलांच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘यहाँ के हम सिंकदर’ हा विशेष मुलांच्या कलागुण सादरीकरणाचा एक प्रयत्न आहे. महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातून या महोत्सवाला सुरूवात होत असून जास्तीत जास्त संख्येने दिव्यांग शाळा, विद्यालये, संस्था, शिक्षक, विद्यार्थ्यांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष एड निलम शिर्के सामंत, उपाध्यक्ष डॉ.दीपा क्षाीरसागर, शैलेश गोजमगुंडे, प्रमुख कार्यवाह सतिश लोटके, राजू तुलालवार, दिपक रेंगे, दिपाली शेळके आदींनी केले आहे. या बाल महोत्सवातून दिव्यांग बालकांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. अशा प्रकारचा महोत्सव राज्यात प्रथमच आयोजित केला जात असून याची सुरुवात बीड येथून होत आहे. ही आनंदाची बाब असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
२५ दिव्यांग शाळांतील ३०० विद्यार्थी सहभागी होणार शहरातील के.एस.के. महाविद्यालयाच्या परिसरात होणाऱ्या महोत्सवात बीड जिल्ह्यातील जवळपास २५ दिव्यांग शाळांचा सहभाग असणार आहे. यात कर्णबधीर, मुकबधीर, अंध, मतिमंद, अस्थिव्यंग अशा अनुदानित, विनाअनुदानीत शाळांचा सहभाग घेता येणार आहे. अंदाजे २०० विद्यार्थी सहभागी होतील. विशेष मुलांच्या गुण कौशल्याचे कौतुक करणारा हा महोत्सव असून ही स्पर्धा नाही. यात नाटक, नक्कला, गाणे, नृत्य, रांगोळी, चित्र योगा, वाद्यवाजवणे, शिल्पकला यातील कोणतीही कला हे विशेष मुले करू शकतात. महोत्सवाच्या ठिकाणी या मुलांनी बनवलेल्या वस्तुचे प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवता येणार आहे.



















