दिनांक ०३ ते ०८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीदरम्यान महानगरपालिका मुख्यालयात होणार शिबिर
पहिल्या टप्प्यात परिमंडळ-१ मधील प्रशासकीय विभाग कार्यालयांतील (वॉर्ड) प्रलंबित प्रकरणांबाबत कार्यवाही
दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ रोजी सादर केलेल्या अहवांलानुसार संबंधित विभागाकडून अवगत करण्यात आलेले कर्मचारी आणि अर्जदारांनीच उपस्थित राहण्याचे आवाहन
केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, मागील ५ वर्षांतील प्रलंबित वारसाहक्क/अनुकंपा पी. टी. प्रकरणे निकाली काढण्यासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने दिनांक ०३ ते ०८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीदरम्यान महानगरपालिका मुख्यालयात दररोज सकाळी ११ वाजेपासून शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ रोजी सादर केलेल्या अहवालानुसार संबंधित विभागाकडून अवगत करण्यात आलेले कर्मचारी तसेच अर्जदारांनीच या शिबिरासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कोणतीही वारसाहक्क/अनुकंपा पी. टी. प्रकरणे प्रलंबित राहणार नाही, या अनुषंगाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (अतिरिक्त कार्यभार) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली प्रलंबित वारसाहक्क, अनुकंपा पी. टी. प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याच्या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक ०३ ते ०८ ऑक्टोबर २०२४ दरम्यान शिबिराचा पहिला टप्पा म्हणजेच परिमंडळ-१ मधील विविध प्रशासकीय विभाग कार्यालयांमधील प्रलंबित प्रकरणांबाबत शिबिर घेण्यात येत आहे. उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) कार्यालय, तिसरा मजला, विस्तारित इमारत, महानगरपालिका मुख्यालय, मुंबई येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या अंतर्गत दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘ए विभाग’, दिनांक ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘डी विभाग’, दिनांक ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘बी आणि सी विभाग’, दिनांक ०८ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘ई विभाग’ कार्यालयांतील प्रलंबित प्रकरणांबाबत शिबिर घेण्यात येईल. दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ रोजी सादर केलेल्या अहवालानुसार संबंधित विभागाकडून अवगत करण्यात आलेले कर्मचारी तसेच अर्जदारांनीच या वेळापत्रकानुसार सकाळी ११ वाजता महानगरपालिका मुख्यालयात उपस्थित राहावे, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.
*शिबिराचे वेळापत्रक*
*शिबिर दिनांक विभाग वेळ*
दिनांक ०३. १०. २०२४ ए सकाळी ११ वा
दिनांक ०४. १०. २०२४ डी सकाळी ११ वा
दिनांक ०७. १०. २०२४ बी आणि सी सकाळी ११ वा
दिनांक ०८. १०. २०२४ ई सकाळी ११ वा


















