Home मुंबई *अमित शहा व राष्ट्रवादी नेत्यांच्या भेटीला कृत्रिम कथानक निर्माण करण्याचा प्रयत्न –...

*अमित शहा व राष्ट्रवादी नेत्यांच्या भेटीला कृत्रिम कथानक निर्माण करण्याचा प्रयत्न – उमेश पाटील यांचा खुलासा*

6
0

* *अमित शहा व राष्ट्रवादी नेत्यांच्या भेटीला कृत्रिम कथानक निर्माण करण्याचा प्रयत्न – उमेश पाटील यांचा खुलासा*

*मुंबई*
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या आजच्या दिल्लीतील भेटीला अनावश्यक राजकीय रंग दिला जात असून, काही अदृश्य शक्तींकडून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद असल्याचे कृत्रिम कथानक निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, हा निव्वळ खोडसाळपणा असल्याचा स्पष्ट खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते *उमेश पाटील* यांनी केला आहे.

काही माध्यमांमध्ये राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांना डावलून ही भेट झाल्याच्या बातम्या येत आहेत. या बातम्या पूर्णतः चुकीच्या, तथ्यहीन आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे उमेश पाटील यांनी ठणकावून सांगितले.

*आजची भेट पूर्वनियोजित आणि औपचारिक -*

उमेश पाटील यांनी सांगितले की, यापूर्वीच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी अमित शहा यांची भेट घेऊन स्वर्गीय अजितदादांच्या निधनानंतर पक्षासमोरील विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली होती. विशेष म्हणजे त्याच भेटीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी स्वतः पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे एक शिष्टमंडळ आपली भेट घेणार असल्याची कल्पना अमित शाह यांना दिली होती आणि वेळ उपलब्ध करून देण्याची विनंतीही केली होती.

स्वर्गीय अजितदादांच्या कार्यकाळातील काही महत्त्वाचे विषय, राज्याच्या हिताचे प्रश्न आणि पक्षाशी संबंधित विविध बाबींची या ज्येष्ठ नेत्यांना सखोल माहिती असल्याने त्याच अनुषंगाने आजची ही पूर्वनियोजित, औपचारिक भेट झाली.

या भेटीदरम्यान संबंधित नेत्यांनी आपापल्या मतदारसंघातील प्रश्न मांडले, तसेच महायुतीतील मित्रपक्षांच्या नेत्यांमध्ये स्वाभाविकपणे होणारी अनौपचारिक चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण झाली.

*पक्ष एकसंघ -*

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा महत्त्वाचा घटक असून आमचा पक्ष राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या खंबीर नेतृत्वाखाली एकसंघ आणि एकदिलाने कार्यरत आहे. माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध करताना वस्तुस्थितीची खातरजमा करावी, केवळ तर्कवितर्कांच्या आधारे पक्षांतर्गत संघर्षाचे चित्र रंगवू नये, मित्रपक्षांच्या औपचारिक भेटीचे राजकारण करू नये, असा सल्लाही उमेश पाटील यांनी माध्यमांना दिला आहे.

—
*सद् रक्षणाय, खल दमनाय.*
*संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर – MAI MEDIA 24*

—

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here