*हेडलाईन:
*नागपूर (प्रतिनिधी – प्रो. शीतल करदेकर) दि. ०२-११-२०२६ :* राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या करत असताना सरकारकडून कुंभमेळ्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याची सडकून टीका काँग्रेस विधिमंडळ नेते *विजय वडेट्टीवार* यांनी केली आहे.
वडेट्टीवार म्हणाले, “दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र मदत देताना ३३ टक्के नुकसानीची अट घातली जाते. पाच हजार रुपयांच्या मदतीसाठीही अटी-शर्तींचा डोंगर उभा केला जातो. दिवाळी तोंडावर आली असताना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडे ठोस नियोजन नाही.”
*रोषणाईवर कोट्यवधी, शेतकऱ्यांसाठी नाही -*
“दुसरीकडे कुंभमेळ्याच्या कार्यक्रमांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचे इव्हेंट सुरू आहेत. ध्वजारोहणासाठी १६ कोटी आणि हेलिपॅडसाठी ३ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. हा पैसा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरला असता तर त्यांना मोठा दिलासा मिळाला असता. कुंभमेळ्याची इव्हेंटबाजी आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याचे काम सुरू आहे. दोन दिवसांत दहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील तर सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे. आत्महत्या करणारे शेतकरी हिंदू नाहीत का?” असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
*निवडणूक आयोगावरही भाष्य -*
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे संविधानाचे रक्षण, लोकशाहीची मजबुती आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी प्रश्न उपस्थित करत आहेत. निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत, मतदार यादीतील बदलांबाबत आणि फॉर्म क्र. ६ मधील सुधारणांबाबत प्रश्न विचारले तर केंद्र सरकारला त्रास का होतो? निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी निदर्शनास आणून देणे ही लोकशाहीतील जबाबदारी आहे. ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रश्न विचारणाऱ्यांना दोष देण्याऐवजी सरकारने उत्तरं द्यावीत, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
—
*सद् रक्षणाय, खल दमनाय.*
*संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर – MAI MEDIA 24*
—
*

























