* *शालार्थ घोटाळा : गुन्हा क्र. ९८/२०२५ मधील आरोपी माजी शिक्षणाधिकारी नितीन बच्छावचा जामीन अर्ज फेटाळला,*
* *उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय*
*नाशिक / मुंबई*
दि. ०२-११-२०२६ :* राज्याला हादरवून सोडणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात आज माननीय मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली.
आज माननीय उच्च न्यायालय येथे महात्मा जोतिबा फुले शिक्षण संस्थेची सुनावणी होती. या सुनावणीमध्ये *गुन्हा क्रमांक ९८/२०२५ मधील आरोपी माजी शिक्षण अधिकारी श्री. नितीन पोपटराव बच्छाव* यांचा जामीन अर्ज माननीय न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
आज दुपारी १२:३० वाजता मुंबई उच्च न्यायालयात शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, किरण कुवर, नितीन बच्छाव, देविदास महाजन, मिनाक्षी गिरी, तसेच उपसंचालक बी.बी. चव्हाण, मनोज रामकृष्ण पाटील, शरद शिंदे, अविनाश पाटील यांच्या जामीन अर्जावर सुनावणी नियोजित होती. त्यापैकी नितीन बच्छाव यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.
*या घोटाळ्याची पार्श्वभूमी:*
राज्यात २०१२ ते २०१९ दरम्यान दीड हजार बोगस शालार्थ आयडी जनरेट करून सुमारे ९०० कोटींचा अपहार झाल्याचे एसआयटीच्या तपासात उघड झाले आहे. भरती बंदी असतानाही मागील तारखांचे खोटे नियुक्ती आदेश तयार करून शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावट आयडी तयार केले गेले. या रॅकेटमध्ये नाशिक, जळगाव, धुळे जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्थांचे चालक आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक एजंटचे मोठे सिंडिकेट कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
यापूर्वी नाशिकर पोलिस ठाण्यात दाखल २ गुन्ह्यांत तब्बल १८० कोटींचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले होते. आता यात आणखी ९०० कोटींची भर पडल्याने अपहाराचा आकडा हजार कोटींच्या घरात जाणार आहे.
*पुढे काय?*
या धक्कादायक खुलाशानंतर शिक्षण विभागाच्या विविध कार्यालयांवर छापे टाकून मूळ कागदपत्रे, भरती फाईल्स ताब्यात घेण्यात आल्या आहेत. नाशिक पोलीस लवकरच याबाबत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असून, उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण विभागातील काही नावे रडारवर आली आहेत. मुख्य गुन्हा दाखल झाल्यानंतर उपसंचालक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी, संस्थाचालक, एजंटवर धडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
—
*सद् रक्षणाय, खल दमनाय.*
*संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर – MAI MEDIA 24*
—

























