Home मुंबई * स्वर लोककलेचा, आठवण लोकशाहीरांची! १६ व्या लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत...

* स्वर लोककलेचा, आठवण लोकशाहीरांची! १६ व्या लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहाचे आयोजन

5
0

* स्वर लोककलेचा, आठवण लोकशाहीरांची! १६ व्या लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहाचे आयोजन

*मुंबई / ठाणे

काही आवाज काळाच्या पडद्याआड जात नाहीत, तर पिढ्यान्पिढ्या मनामनांत घुमत राहतात. लोकशाहीर विठ्ठल उमप हे असेच अजरामर व्यक्तिमत्व! आपल्या पहाडी आवाजाने आणि लोककलेवरील निष्ठेने त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला समृद्ध केले. आज ते प्रत्यक्षात आपल्यात नसले तरी त्यांची गाणी आणि कलेचा वारसा रसिकांच्या स्मरणात जिवंत आहे.

लोककला, लोकसंगीत आणि सामाजिक जाणीव यांचा सुरेल संगम घडवणारे लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या या ज्येष्ठ शाहिराने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनशैलीतून लोकपरंपरेला समृद्ध केले.

*१६ व्या स्मृती समारोहाचे आयोजन -*

याच अजरामर आठवणींना स्वरांमधून अभिवादन करण्यासाठी त्यांच्या *१६ व्या स्मृतिदिनानिमित्त १६ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह* आयोजित करण्यात आला आहे. याच सोहळ्यात *विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या ‘मृदगंध पुरस्कारां’चे* वितरण *दि. २६ नोव्हेंबर रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे सायं. ६.०० वाजता* संपन्न होणार आहे. समाजाच्या विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात यंदा कोणाच्या कार्याचा सन्मान होणार, याची उत्सुकता आहे.

*नंदेश उमप यांची भावना -*

“बाबांची आठवण माझ्यासाठी केवळ आठवण नाही, तर ती माझ्या आयुष्याचा आणि कलेचा अविभाज्य भाग आहे. त्यांनी आपल्या आवाजातून लोकांच्या मनात जे स्थान निर्माण केलं, तो वारसा पुढे घेऊन जाणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहाच्या माध्यमातून बाबांना आदरांजली वाहताना एकच भावना असते – त्यांनी जपलेली लोककला अशीच जिवंत राहावी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचावी,” असे नंदेश उमप म्हणाले.

*फाऊंडेशनचा वारसा -*

२०१२ साली स्थापन झालेले विठ्ठल उमप फाऊंडेशन आजवर अनेक गरजूंना मदतीचा आधार ठरले आहे. लोककलेसोबतच समाजसेवेचा वारसा जपत नंदेश उमप यांनी वडिलांचे कार्य अविरतपणे पुढे नेले आहे.

याआधी पद्मश्री शाहीर साबळे (जीवन गौरव), ना.धों. महानोर, अशोक पत्की, सुलोचना चव्हाण, सुबोध भावे, विक्रम गोखले (जीवन गौरव), पद्मश्री डॉ. अभय बंग, डॉ. रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे, प्रशांत दामले, दिलीप प्रभावळकर (जीवनगौरव), सुदेश भोसले, ओम राऊत, प्राजक्ता कोळी, रिंकू राजगुरू यांसह अनेक मान्यवर मृदगंध पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

—
*सद् रक्षणाय, खल दमनाय.*
*संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर – MAI MEDIA 24*

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here