Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *प्रदीप वेलणकर यांच्या ‘मनापासून’ पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन!*

*प्रदीप वेलणकर यांच्या ‘मनापासून’ पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन!*

9
0

*प्रदीप वेलणकर यांच्या ‘मनापासून’ पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन!*

*आयुष्यभरातील अनुभवांचा अनोखा शब्दाविष्कार*

अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर आता आपल्या लेखणीतून वाचकांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या अनुभवविश्वाचा, आठवणींचा आणि आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा वेध घेणाऱ्या ‘मनापासून’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, १ नोव्हेंबर रोजी मुंबईतील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात उत्साहात पार पडला. साहित्य, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्यात वेलणकर यांच्या लेखनप्रवासाचे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर असलेल्या प्रेमाचे दर्शन घडले. विशेष म्हणजे, उपस्थितांच्या प्रेमाने भारावलेल्या प्रदीप वेलणकर यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करत हा क्षण आपल्यासाठी किती आनंदाचा आणि तितकाच भावनिक असल्याचे सांगितले. ग्रंथालीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि जाहिरात क्षेत्रात कार्यरत असलेल्या मीरा वेलणकर यांनी आपल्या कल्पकतेतून आकर्षक पद्धतीने साकारले आहे.

आपल्या भावना व्यक्त करताना वेलणकर म्हणाले, “आजचा दिवस बोलण्याचा नाही, तर अनुभवण्याचा आहे. आज आनंद आहे, पण त्याचबरोबर मनावर दडपणही तेवढंच आहे. लेखक ही संज्ञा अत्यंत मोठी आणि उच्च स्तरावरील आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. त्या साहित्यिक उंचीपासून मी अजूनही खूप दूर आहे, याचीही नम्र जाणीव मला आहे. लहानपणापासून जे काही अनुभवलं, त्या अनुभवांची नोंद ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी ‘मनापासून’ या पुस्तकातून केला आहे. “माझ्या आयुष्यातील अनुभव शब्दबद्ध करून मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. माझे हे अनुभव तुम्हीही तितक्याच ‘मनापासून’ आपुलकीने स्वीकाराल, याची मला खात्री आहे. तुमच्याकडून मिळणारा हा प्रतिसाद माझ्यासाठी निश्चितच आनंद आणि समाधान देणारा असेल.”पुस्तकाच्या प्रकाशनासाठी उपस्थित राहिलेल्या मान्यवरांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना ते पुढे म्हणाले, “आज इथे उपस्थित असलेले सर्वजण माझ्यावरील प्रेमाखातर आले आहेत. तुमच्या या प्रेमाचं मोल माझ्यासाठी खरोखरच अनमोल आहे. मला शुभेच्छा देण्यासाठी आणि माझ्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही आवर्जून आलात, त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे.”

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना रजनी वेलणकर म्हणाल्या, “आम्ही आमचा संसार अत्यंत प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने केला. आज सहचारिणी आणि सहकलाकार म्हणून त्यांचा प्रवास जवळून पाहताना त्यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा मला विशेष आनंद वाटतो. त्यांनी आयुष्यातील अनुभवांना शब्दरूप दिलं आहे, याचा मला अभिमान आहे. हे पुस्तक मी नक्कीच वाचणार असून, वाचल्यानंतर त्याविषयीचा माझा अभिप्रायही त्यांना आवर्जून कळवणार आहे.”

प्रदीप वेलणकर यांची कन्या गौरी हिने वडिलांविषयीच्या भावना व्यक्त करताना, ‘वडिलांच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांच्या समृद्ध जीवनप्रवासाविषयी अभिमान व्यक्त केला. “आमच्या वडिलांना आयुष्यात जे काही हवं होतं, ते कदाचित सगळंच मिळालं नसेल; मात्र त्यांनी आयुष्याला भरभरून दिलं आहे. त्यांच्या या प्रवासाचा आणि त्यांनी जपलेल्या मूल्यांचा आम्हाला मनापासून अभिमान आहे,” अशा भावना तिने व्यक्त केल्या.

प्रदीप वेलणकर यांच्या या आनंदाच्या क्षणी त्यांच्या पत्नी रजनी वेलणकर, कन्या गौरी, मीरा आणि मधुरा यांच्यासह नातवंडेही उपस्थित होती. संपूर्ण वेलणकर कुटुंबाच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला कौटुंबिक जिव्हाळ्याची आणि आनंदाची खास किनार लाभली. यावेळी उपस्थित असलेल्या प्रदीप वेलणकर यांच्या सहकलाकारांनीही त्यांच्यासोबतच्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावातील पैलू, कामाप्रती असलेली निष्ठा, सहकलाकारांशी जपलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि त्यांच्यासोबत घडलेले काही खास किस्से यावेळी उपस्थितांनी आवर्जून सांगितले. त्यांच्या या आठवणींमधून प्रदीप वेलणकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू उलगडले.विशेष म्हणजे, या पुस्तकातील निवडक उतारे अभिनेते सुबोध भावे, सुमीत राघवन आणि उमेश कामत यांनी आपल्या भावपूर्ण शैलीत सादर केले.

ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, वंदना गुप्ते, इला भाटे, उज्वला जोग आणि रजनी वेलणकर यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी अभिनेते उमेश कामत, सुबोध भावे आणि सुमीत राघवन यांनी विशेष सहभाग नोंदवला. तसेच या सोहळ्यातअर्चना गोरे, मंदार आपटे आणि प्राजक्ता रानडे यांनी आपल्या सुरेल स्वरांनी विशेष रंगत आणली. डॉ.समीरा गुजर सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here