Home जालना / परभणी / बीड / लातूर / हिंगोली / नांदेड / उस्मानाबाद *दुष्काळात मदतीचा हात, भविष्यासाठी पाण्याचा संकल्प; एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांना ग्वाही*

*दुष्काळात मदतीचा हात, भविष्यासाठी पाण्याचा संकल्प; एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांना ग्वाही*

9
0

*दुष्काळात मदतीचा हात, भविष्यासाठी पाण्याचा संकल्प; एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांना ग्वाही*

*नांदेड उत्तरमधील रुग्णालयासह विविध विकासकामांचे लोकार्पण*

*दुष्काळाने ग्रासलेल्या शेतकऱ्याला शिवसेनेकडून चारा पाणी देऊन मदतीचा आधार*

नांदेड, ता. 01 :

दुष्काळाच्या संकटात बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही, तातडीची मदत देतानाच भविष्यासाठी सिंचन आणि पाणी प्रकल्पांना गती देऊ, विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे लोकार्पण व उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार अशोक चव्हाण, आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोंढारकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, आमदार अमर राजुरकर, आमदार भीमराव केराम, आमदार जितेश अंतापूरकर, नांदेड मनपाच्या महापौर कविता मुळे आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना, माहूरच्या रेणुका मातेला वंदन करून नांदेडच्या आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि कष्टकरी शेतकऱ्यांच्या भूमीचा गौरव करत शिंदे यांनी आरोग्य, रस्ते, सिंचन आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा आढावा घेतला. नव्या रुग्णालयात स्कॅनिंग व डायलिसिस मशीन तातडीने उपलब्ध करून देण्याबरोबरच १०० बेडचे रुग्णालय २०० बेडपर्यंत वाढविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

एडीबीच्या माध्यमातून ५०० बेडचे नवीन रुग्णालयही उभारले जात असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य संवाद यात्रेच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचे काम सुरू असून, हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कृषी महाविद्यालय, अहिल्यादेवी स्मारक, हनुमानगड संस्थान जीर्णोद्धार, भूमिगत गटार, रस्ते, जोडरस्ते, रिंगरोड आणि इनामी जमीन वर्ग-२ मधून वर्ग-१ करण्याच्या प्रश्नावर सरकार काम करत आहे. बालाजी कल्याणकर यांच्या पाठपुराव्याचे कौतुक करत २०२२ च्या सत्तांतराच्या वेळीही ते खांद्याला खांदा लावून सोबत होते, असे शिंदे म्हणाले. महायुती मजबुतीने पुढे नेत विकासाची गंगा आणण्याचे आवाहन त्यांनी केले.

दुष्काळ जाहीर केल्यानंतर विविध सवलतींसह शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये म्हणून पाच हजार रुपयांची तातडीची मदत मंजूर केली आहे. ही अंतिम मदत नसून पुढील मदतही मिळत राहील. केंद्र आणि राज्य सरकार बळीराजाच्या पाठीशी असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

कर्जवसुलीच्या नावाखाली मायक्रो फायनान्स कंपन्या किंवा सावकारांनी शेतकऱ्यांना त्रास देऊ नये; चुकीच्या वसुलीमुळे आत्महत्या झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दुष्काळाचा फटका कुटुंबाला बसत असल्याने शिक्षण आणि मुलींच्या विवाहाचीही चिंता सरकार करणार नाही. हदगावमध्ये १०० मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा होणार असून खासदार, आमदारांनीही गरजू कुटुंबांच्या विवाहांची जबाबदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. ‘आपत्ती तिथे शिवसेना, संकट तिथे शिवसेना’ या भावनेतून सायकली, शिलाई मशीन आणि दिवाळी शिध्याचे वाटप करण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजना बंद होणार नसून तिच्यामुळे महिलांच्या हातात आर्थिक ताकद आली आहे. एसटीमध्ये ५० टक्के सवलत, मुलींचे उच्च शिक्षण आणि केंद्र-राज्य किसान सन्मान निधीतून वर्षाला १२ हजार रुपयांची मदत याचा त्यांनी उल्लेख केला.

दुष्काळ आहे म्हणून विकासकामे थांबणार नाहीत, असे स्पष्ट करत त्यांनी नांदेड उत्तरसाठी एसटी बसस्थानकाची मागणी पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांना दिले. ११ जलसंपदा प्रकल्पांना मंजुरी, मुख्यमंत्री असताना १४० सिंचन प्रकल्पांना मंजुरी आणि सुमारे १४ हजार कोटींच्या पाणी योजनांचा उल्लेख करत ‘आज मदतीचा हात, उद्या शेताला पाणी’ हा सरकारचा दृष्टिकोन असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधकांनी संकटात राजकारण न करता मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन करत “मी शेतकऱ्याचा मुलगा आहे; बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही. तुमच्या हक्काचा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” असा विश्वास त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here