*राष्ट्रीय नागरी आरोग्य अंतर्गत कार्यरत ७१९ आशा स्वयंसेविकांनाही प्रत्येकी पाच हजार रुपये भाऊबीज भेट*
*महापौर रितू तावडे यांचे निर्देश*
*आशा स्वयंसेविका; आरोग्य स्वयंसेविका, बालवाडी शिक्षिका व मदतनिसांसह सर्व घटकांच्या कामाची बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दखल*
दीपावली २०२६ निमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतील आशा स्वयंसेविकांबाबत महापौर रितू तावडे यांनी महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या अखत्यारीतील १,४६१ आशा स्वयंसेविकांना पहिल्यांदाच प्रत्येकी ५,००० रुपये भाऊबीज भेट जाहीर केल्यानंतर, आता राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी कार्यरत असलेल्या ७१९ आशा स्वयंसेविकांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे मुंबईत आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या एकूण २,१८० आशा स्वयंसेविकांना प्रथमच ५,००० रुपयांचे दीपावली सानुग्रह अनुदान मिळणार आहे.
प्रारंभी, महानगरपालिकेच्या १,४६१ आशा स्वयंसेविकांना भाऊबीज भेट जाहीर झाली होती. याच धर्तीवर मुंबईत तळागाळात आरोग्य सेवा देणाऱ्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानातील (NUHM) आशा स्वयंसेविका या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी महापौर रितू तावडे यांनी व्यक्तिशः पुढाकार घेतला. त्यांनी प्रशासनाला निर्देश देत उर्वरित ७१९ आशा स्वयंसेविकांनाही समान न्याय मिळवून दिला आणि त्यांचा समावेश या सानुग्रह अनुदानात करून घेतला आहे.
महानगरपालिकेचे नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणेच जनसामान्यांशी थेट जोडल्या गेलेल्या इतर सर्व घटकांच्या कामाचीही महानगरपालिकेने यथोचित दखल घेतली आहे. या निर्णयानुसार महानगरपालिकेतील २,३९३ सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना (CHV) प्रत्येकी १४,००० रुपये, तर २,३६० बालवाडी शिक्षिका आणि मदतनिसांना प्रत्येकी ७,००० रुपयांची भाऊबीज भेट दिली जाणार आहे.
मुंबईकरांच्या आरोग्याची अहोरात्र काळजी घेणाऱ्या आशा व आरोग्य स्वयंसेविका आणि बालकांच्या शिक्षणाचा पाया रचणाऱ्या बालवाडी शिक्षिका-मदतनीस हे सर्व जण महानगरपालिकेच्या यंत्रणेचा महत्त्वाचा भाग आहेत, असे नमूद करून या सर्व भगिनींची दिवाळी आनंदाची व उत्साहाची व्हावी, याच उद्देशाने हा सर्वसमावेशक निर्णय घेण्यात आल्याचे महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले आहे.
***
























