Home मुंबई *मध्य वैतरणा धरण प्रकल्पाच्या बदल्यात दोन लाख झाडे लावली का, याचा उद्धव...

*मध्य वैतरणा धरण प्रकल्पाच्या बदल्यात दोन लाख झाडे लावली का, याचा उद्धव ठाकरेंनी हिशेब द्यावा*

8
0

*मध्य वैतरणा धरण प्रकल्पाच्या बदल्यात दोन लाख झाडे लावली का, याचा उद्धव ठाकरेंनी हिशेब द्यावा*
मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अमित साटम यांनी ठेवले मर्मावर बोट

मुंबई महापालिकेत १९९७ ते २०२२ या काळात उद्धव ठाकरे यांची सत्ता आणि आदित्य ठाकरे यांचा प्रभाव होता. त्यावेळी मुंबई महापालिकेच्या वतीने मध्य वैतरणा धरणाचा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी 10 हजार झाडे तोडणे अपेक्षित असताना लाखभर झाडे तोडण्यात आली होती. त्याची भरपाई म्हणून बीड जिल्ह्यात 540 हेक्टर जमीन सुमारे दोन लाख झाडे लावण्यासाठी वन विभागाला हस्तांतरित करून मुंबई महापालिकेने वन विभागाला कोट्यवधी रुपयेही दिले होते. कर्जत येथे पर्यटन करण्यापेक्षा बीड जिल्ह्यात जाऊन झाडे मोजा आणि मुंबई महापालिकेने दिलेल्या पैशांचा हिशेब तपासा, असे आव्हान मुंबई प्रदेश भाजपा अध्यक्ष आ. अमित साटम यांनी शुक्रवारी दिले. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेस पक्ष, तसेच त्या अभिनेत्यांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वैतरणा प्रकल्पासाठी किती झाडे तोडली याची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी आ. साटम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
कर्जत येथील साय डोंगर परिसरात शासनाच्या वतीने पंप स्टोरेज पॉवर प्लांटच्या उभारणीसाठी वृक्षतोड करणे अपेक्षित असल्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरू आहे. अनेक नेते, अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते पर्यावरणाचा कळवळा आल्याप्रमाणे कर्जत येथे भेट देत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक लोक या ठिकाणी पर्यटनासाठी आणि स्थळपाहणीसाठी जात असल्याचे आपण पाहत आहोत. पर्यावरणाच्या नावाखाली राजकारण करणे, जनतेची दिशाभूल करणे, शासनाने सुरू केलेली विकासकामे रोखणे आणि समाजात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करणे, हा या प्रकाराचा दुसरा भाग असल्याचे आ. साटम यांनी नमूद केले.
देशाविरोधात काम करणाऱ्या काही शक्ती भारतात एखादा मोठा आणि सकारात्मक प्रकल्प कार्यान्वित होत असताना देशाबाहेरील शक्तींच्या माध्यमातून काही अर्बन नेटवर्कला निधी पुरवून आंदोलने आणि विरोध प्रदर्शन उभे करतात. याबाबत गुप्तचर विभागाने यापूर्वी अहवाल दिले आहेत. आधी अशा आंदोलनांमध्ये काही एनजीओ आणि व्यक्ती सहभागी होत असत. आता त्यात अर्बन नक्षलवादी गट आणि देशातील विरोधी पक्षही सहभागी झाले आहेत. भारत जगातील चौथी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनला आहे. ही प्रगती काही जागतिक शक्तींना पाहवत नसल्याने देशात अराजकता माजवण्याच्या त्यांच्या कटात काँग्रेस, उबाठा, मनसे तसेच काही सिने-अभिनेते सहभागी असल्याचा आरोप करत आ. साटम महाराष्ट्रातील जनतेने हा कट समजून घेणे आवश्यक असल्याचे आवाहन केले.
आ. साटम पुढे म्हणाले, सर्वप्रथम शाश्वत विकास म्हणजे काय, हे समजून घेणे आवश्यक आहे. विकास करत असताना पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे. जेणेकरून भविष्यात जन्माला येणाऱ्या पिढ्यांना त्या विकासाचा कोणताही फटका बसणार नाही, त्यांना त्रास होणार नाही, पर्यावरणाची हानी होणार नाही. यालाच शाश्वत विकास म्हणतात. मात्र, शाश्वत विकास या शब्दांचा खरा अर्थ अनेक लोक समजून घेत नाहीत. त्यांच्यासाठी पर्यावरण हा फॅशनचा विषय झाला आहे. पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज यांवर बोलणे ही एक फॅशन झाली आहे. अनेक लोक पर्यावरणावर मोठमोठ्या गप्पा मारतात आणि पर्यावरणाचा कोणताही मुद्दा आला की, जणू काही आपणच या देशातील आणि महाराष्ट्रातील एकमेव पर्यावरणाचे कैवारी आहोत, अशा आविर्भावात वावरतात. मात्र, शाश्वत विकास, स्वच्छ उर्जा, ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरणीय बदल यांची गणिते काय आहेत, याची शिकवणी महाराष्ट्रातील काही नेते आणि अभिनेत्यांनी घेणे आवश्यक आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
या प्रकल्पामुळे हजारोंच्या संख्येने रोजगारनिर्मिती होणार आहे. एखादा प्रकल्प येतो, तेव्हा त्यात थेट आणि अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होते. या ३,००० मेगावॅटच्या प्रकल्पामुळे हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे. हे रोजगार महाराष्ट्रातच निर्माण होणार आहेत. प्रकल्प महाराष्ट्रात आहे आणि वीजही सर्वप्रथम महाराष्ट्रालाच मिळणार आहे. एखाद्या राज्यात अशा प्रकारचे रोजगार निर्माण झाले, तर त्या राज्याची उन्नती, प्रगती आणि विकास होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकल्पांना विरोध करणे म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाला, उन्नतीला आणि प्रगतीला विरोध करण्यासारखे आहे. या प्रकल्पाला विरोध करून संपूर्ण देशाला मार्ग दाखवणाऱ्या महाराष्ट्राच्या विकासात अडथळा आणण्याचे काम केले जात असल्याची खरमरीत टीका आ. साटम यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here