*‘तेजोमयी’ कार्यक्रमातून स्त्रीशक्तीचा जागर; संगीत, नृत्य आणि अभिवाचनाचा सुरेल आविष्कार*
*चित्रनगरीच्या चित्रांगण कट्ट्यावर नवरात्रोत्सवानिमित्त स्त्रीशक्तीच्या गौरवाचा विशेष उपक्रम*
………………………
मुंबई १७ ऑक्टो. : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचा गौरव, तिच्या संघर्षाचा सन्मान आणि तिच्या कर्तृत्वाचा जागर घडवणारा ‘तेजोमयी – जागर स्त्रीशक्तीचा’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी दादासाहेब फाळके चित्रनगरीतील चित्रांगण कट्ट्याच्या वतीने आयोजित करण्यात आला. चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महिला अधिकारी यावेळी उपस्थित होत्या.
स्त्रीच्या विविध रूपांचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीतील स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. देवीच्या आराधनेपासून ते आधुनिक स्त्रीच्या आत्मभानापर्यंतचा प्रवास संगीत, नृत्य, कविता आणि अभिवाचन अशा विविध कलाप्रकारांतून उलगडण्यात आला. स्त्रीच्या आयुष्यातील भावनिक, सामाजिक आणि वैचारिक पैलूंसह तिचा संघर्ष, जिद्द, स्वाभिमान, नात्यांमधील भावबंध आणि कर्तृत्व यांचे संवेदनशील दर्शन या सादरीकरणातून घडले.
या कार्यक्रमात अभिनेत्री अदिती सारंगधर आणि अभिनेत्री स्वानंदी टिकेकर यांनी सहभाग घेतला. गायिका निधी रानडे आणि गायक शार्दूल कवठेकर यांच्या सादरीकरणातून संगीताचा सुरेल अनुभव रसिकांना मिळाला. अनन्या गोवित्रीकर आणि समूह यांच्या नृत्याविष्काराने कार्यक्रमाला विशेष दृश्यात्मक आकर्षण प्राप्त झाले. भक्तिगीते, भावगीते, लोकसंगीत आणि आशयपूर्ण साहित्यिक अभिवाचन यांच्या माध्यमातून स्त्रीजीवनातील विविध भावछटा प्रभावीपणे मांडण्यात आल्या.
कार्यक्रमाची संकल्पना, आखणी आणि संशोधन उत्तरा मोने यांचे होते, तर सूत्रसंचालन स्वप्ना कुंभार-देशपांडे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमातून स्त्रीच्या सामर्थ्याचा, संवेदनशीलतेचा आणि आत्मविश्वासाचा गौरव करण्यात आला. कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचा जागर घडवणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी सांस्कृतिक अनुभव ठरला.
दादासाहेब फाळके चित्रनगरीतील चित्रांगण कट्ट्याच्या माध्यमातून कलाविष्कारांना व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवरील आशयपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ‘तेजोमयी – जागर स्त्रीशक्तीचा’ या कार्यक्रमानेही या उपक्रमाची सांस्कृतिक समृद्धी आणि सामाजिक आशय अधोरेखित केला.
………….
























